शिक्षक – मनोज वैद्य

अ, ब,क,ड गिरवत
A, B, C, D पण शिकवली
माझ्या शिक्षकांनी मला
अक्षरांची वाट दाखवली

काळा फळा, डस्टर, बुक
सोबत साहित्य त्यांचे खडू
शाबासकीची थाप कधी
कधी पाठीत धम्मक लाडू

केला नाही कंटाळा कधी
कधी मारली नाही चाट
शिस्त आम्हा शिकवली
समजावले रुबाब आणि थाट

शिकविण्यात बघितली नाही
विद्यार्थी श्रीमंत की गरीब
गोरा काळा, उंच ठेंगु की
सवर्ण आहे की दलित

शिकवणे हा एकच धर्म
माझ्या शिक्षकांना ठाऊक
पाया माझा मजबूत राहो
कुठे केली नाही चूक

प्रायमरी, हायस्कुल,कॉलेज
जीवनात जे जे ठरले आदर्श
शिक्षकांनी त्या त्या वेळी
मज केला परीसस्पर्श

संस्कारित भारत भू वर
शिक्षक-विद्यार्थी अतूट बंधन
म्हणूनच शिक्षक दिनी त्यांना
करतो मनोभावे वंदन

मनोज वैद्य, महाल, नागपूर

Leave a Reply