मुंबईत भाजपचाच महापौर पाहिजे – देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : ५ सप्टेंबर – मुंबई महानगरपालिका निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात भाजपकडून पालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी पूर्ण तयारी सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीसांनी मुंबईत महापौर भाजपचाच पाहिजे, असं आवाहन केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं, की पूर्ण देशाला माहिती आहे की चाणक्य कोण आहे? आता मुंबई महानगरपालिका निवडणूक अशी लढा की जणू ही शेवटची निवडणूक आहे. काहीही करून मुंबई पालिकेवर भाजपाचा महापौर बसलाच पाहिजे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.
मुंबई पालिकेसंदर्भात भाषण करताना आशिष शेलार म्हणाले, की मुंबई पालिका निवडणूकीत भाजपाचे १३५ जागा निवडून आणणे हे मिशन असणार आहे
गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन बैठका होणार आहेत. पहिली बैठक ही कोअर कमिटीची बैठक आहे. ही बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या निवासस्थानी पार पडत आहे. ही बैठक मुंबई महानगरपालिका संदर्भात आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सहभाग आहे.
तर दुसरी कोअर कमिटीची बैठक मुंबई विमानतळावर पार पडेल. या बैठकीत प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित असतील. यामध्ये प्रदेश स्थरावरचा आढावा घेण्यात येईल. ही बैठक ५ वाजता होताना पाहायला मिळेल. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, मंत्री गिरीष महाजन, आशिष शेलार यांचा समावेश असणार आहे.

Leave a Reply