संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल

तिरुवनंतपूरम : २ सप्टेंबर – संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये ‘आयएनएस विक्रांत’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी ‘आयएनएस विक्रांत’ म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे.
विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे. विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल १४०० पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत. तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.
विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजले जाते. विमनानवाहू युद्धनौक बांधणे हे जगात आत्तापर्यंत फक्त मोजक्या देशांना शक्य झाले आहे. आता यामध्ये भारताचीही भर पडली आहे.

Leave a Reply