संपादकीय संवाद – तेजस्वी यादव यांनीही विरोधकांच्या भानगडी केंद्रीय तपास यंत्रणांना सोपवाव्यात

भारतातील केंद्रीय तपास यंत्रणा फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवरच धाडी टाकून कारवाई करतात, भाजपमध्येही अनेक भ्रष्ट लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ते सर्व दुधाने धुतलेले आहेत का? असा सवाल बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये बोलतांना काही राजकीय पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात, असा आरोप केला होता त्याच्या प्रत्युत्तरात तेजस्वी यादव यांनी हे वक्तव्य केले आहे.
तेजस्वी यादव यांचे हे विधान पूर्णतः चुकीचे म्हणता येणार नाही, भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक सर्वच पक्षात आहेत, मात्र केंद्रीय तपास यंत्रणांना त्याची माहिती दिली जायला हवी, त्या संदर्भातील ठोस पुरावे उपलब्ध करून दिले जायला हवेत, केंद्रीय तपास यंत्रणांजवळ देशातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवता येईल अशी यंत्रणा आजतरी उपलब्ध नाही, आणि भविष्यातही अशी यंत्रणा उपलब्ध होईल असे वाटत नाही. अश्यावेळी त्यांना जनसामान्यांकडून आलेल्या तक्रारी आणि त्या सोबत असलेले पुरावे यावरच आवलंबून राहावे लागते, मात्र तुम्ही दिलेले पुरावे जर ठोस असले तर कारवाई टाळता येत नाही. अश्यावेळी अश्या गुन्हेगारांना सरकार संरक्षण देत असेल, तर न्यायालयात देखील दाद मागता येते. आपल्या देशात न्यायालयीन हस्तक्षेपामुळे कथित भ्रष्टाचाराच्या प्रकारात काही मुख्यमंत्र्यांनाही पद सोडावे लागले होते, याची इतिहासात नोंद सापडते. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या दबावात कायम काम करू शकणार नाहीत, हे नक्की.
सध्या भाजप विरोधकांच्याच मागे केंद्रीय तपासयंत्रणांचा ससेमिरा लागला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र तिथे भाजपमधील मंडळींचा पाठपुरावा करभणीभूत ठरतो, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास भाजपचे एक नेते किरीट सोमय्या यांनी विविध वैधानिक आयुधांचा वापर करून विरोधकांचे भ्रष्टाचार खणून काढले, प्रत्येक टप्प्यावर त्याचा पाठपुरावा केला, त्यामुळे अनेक विरोधी नेत्यांवर कारवाई झाली आहे.
राजकरणात विरोधकाला नामोहरम करणे हे प्रथम कर्तव्य असते, त्यामुळे राजकीय पक्ष विरोधकांच्या भानगडी खणून काढतात, आणि त्यांचा पाठपुरावा करून विरोधक कसे अडचणीत येतील हे बघत असतात, कोणताही राजकीय पक्ष स्वपक्षीयांच्या भानगडी कधीच खणून काढणार नाही. ही बाब लक्षात घेता भाजपचे लोक आपल्या राजकीय विरोधकांच्या भानगडी बाहेर आणून त्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करतात हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे.
हाच प्रकार करण्यासाठी तेजस्वी यादव किंवा इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना कुणी रोखले आहे? ज्या प्रमाणे भाजपचे नेते विरोधकांच्या भानगडी प्रकाशात आणतात त्यासाठी प्रसंगी मेहनत करतात, आणि विरोधकांना पुरते जेरीस आणतात, त्याचप्रमाणे विरोधकांनीही प्रयत्न करावे, तेजस्वी यादव यांच्या म्हणण्यानुसार भाजपचे ३००हुन अधिक खासदार आणि १००० पेक्षा अधिक आमदार आहेत, तेजस्विनीं आपल्या पक्षातील काही लोकांना या बाबतीत कामाला लावावे किमान बिहारमधल्या भाजप आमदार खासदाराच्या भानगडी (असल्यास आणि सापडल्यास ) ते बाहेर आणू शकतील. या देशाच्या दृष्टीने ते एक महत्वपूर्ण योगदान ठरू शकेल. बिहारमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला, तर त्यांनी इतर राज्यांमधल्या त्यांच्या मित्रपक्षांनाही हे काम सांगावे, महाराष्ट्रात शरद पवार, लगेचच या कामासाठी कुणाचीतरी नेमणूक करू शकतील, असे झाले तर सर्वच पक्षातल्या सर्वच नेत्यांवर वचक बसेल आणि राजकारणाचे शुद्धीकरण व्हायला मदत होईल, त्यामुळे तेजस्वी यादव यांनी हे पाऊल जरूर उचलावे पंचनामाचा त्यांना कायम पाठिंबाच राहील.

अविनाश पाठक

Leave a Reply