नागरिकांच्या विरोधानंतरही गडचिरोलीतील ३ हत्ती मध्यरात्रीच गुजरातला रवाना

गडचिरोली : २ सप्टेंबर – जिल्ह्यातील आलापल्ली जवळ असलेल्या पातानील हत्तीकॅम्प येथील वन विभागाचे तीन हत्ती मध्यरात्री जामनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले. विरोधानंतरही अखेर हे हत्ती गुजरातला पाठविल्याने या भागातील नागरिकांसह पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून येथील हत्ती गुजरातला हलविण्यावरून वाद सुरू होता.
या भागातील नागरिक व लोकप्रतिनिधी हत्तींच्या स्थलांतराविरोधात असल्याने आदेश मिळूनही हत्ती हलविण्यात आले नव्हते. मात्र, चार दिवसांपूर्वी आलापल्ली वन विभागाला वरिष्ठ स्तरावरून पातानील येथील हत्ती हलविण्याबाबत पत्र मिळाले.त्यानुसार मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान रिलायन्स उद्योग समूहद्वारे संचालित गुजरातच्या जामनगर येथील राधा कृष्ण वेल्फेअर ट्रस्टचे तीन विशेष वाहन येथे दाखल झाले. रात्रीच्या अंधारात येथील ३ हत्तींना या विशेष वाहनांमधून जमनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले.
दरम्यान, या संदर्भात कळताच नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. समाजमाध्यमात देखील या निर्णयाविरोधात मोहीम चालविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या स्थलांतराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील केली होती. वन विभागाला मिळालेल्या आदेशानुसार या भागातील एकूण ८ हत्तींचे जामनगरला स्थलांतर करायचे होते. त्यापैकी तीन रवाना करण्यात आल्याने कमलापूर हत्तीकॅम्प येथील उर्वरित ५ हत्ती देखील लवकरच पाठविण्यात येईल, अशी चर्चा आहे.

Leave a Reply