अशोक चव्हाण आणि माझी विशेष अशी कोणतीही भेट झालेली नाही – देवेंद्र फडणवीस

पुणे : २ सप्टेंबर – एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील ४० आमदार फोडल्यानंतर राज्यात एकच भूकंप घडवला होता. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही मोठ्याप्रमाणात फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट कारणीभूत ठरली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयाची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस-चव्हाणांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्याशी माझी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगत कानावर अक्षरश: हात ठेवले. त्यावर तु्म्ही आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनावेळी भेटलात, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी म्हटले. त्यावर खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘ अहो ते तर एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला ते पोहोचले, मी पण पोहोचलो. ते गणपतीचे दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोहोचलो. अशा भेटी तर सगळ्यांच्याच होतात. पण अशोक चव्हाण आणि माझी विशेष अशी कोणतीही भेट झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १५० इलेक्ट्रिक बस आणि चार्जिंग स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, हेदेखील सांगून टाकले. तसेच पुणे महानगरपालिकेचे दोन भाग करण्याचा कोणताही विचार नाही. आपण चांगल्या विषयांवर बोलू. आपल्याला विकास करायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर गप्पा झाल्या नसल्याचं स्पष्टीकरण चव्हाणांनी दिलं आहे.

Leave a Reply