चौकशीला घाबरून वनविभागाच्या क्षेत्र सहाय्यकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

भंडारा : १ सप्टेंबर – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईबाबत चौकशीला बोलविलेल्या वन विभागाच्या क्षेत्र सहायकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील कांद्री वनपरिक्षेत्रातील गायमुख जंगलात बुधवारी दुपारी उघडकीस आली.
अजाबराव सीताराम लोहारे (वय ५२) रा. उमरेड, जि. नागपूर असे मृत क्षेत्र सहायकाचे नाव असून, तो लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत होता. जांब या गावी तो एकटाच भाड्याने राहत होता.
२५ ऑगस्ट रोजी लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली होती. हे तिन्ही कर्मचारी अजाबराव लोहारे याच्या हाताखाली कामावर होते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अजाबराव लोहारे याला २९ ऑगस्ट रोजी बोलविले होते. या प्रकाराचा जबर धसका अजाबराव याने घेतला. तो २८ ऑगस्टपासून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतला असता सापडला नाही. दरम्यान, बुधवारी दुपारी कांद्री वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी गायमुखच्या जंगलात गस्तीवर असताना अजाबराव याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. वनकर्मचार्यांनी ही माहिती लेंडेझरी वन विभागाला दिली. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. मृतक अजाबरावच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा आप्तपरिवार आहे.

Leave a Reply