संपादकीय संवाद – अण्णा हजारेंना उत्तर देण्यासाठी केजरीवालांनी भाजपच्या आड लपणे चुकीचे

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे एका काळातील प्रवर्तक असलेल्या अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढली असल्याची टीका केली आहे, त्याच्या प्रत्युत्तरात केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्यावर टीका करत असल्याचा पलटवार केला आहे.
इथे प्रश्न असा निर्माण होतो की, अण्णा हजारे हे भाजपच्या तालावर नाचणारे नेते आहेत का? कारण अण्णा हे एक स्वतंत्र प्रज्ञेनें काम करणारे ग्रामीण क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला आणि त्यात काँग्रेस असो किंवा भाजप किंवा शिवसेना कुणाचीही मुलाहिजा न ठेवता सर्वांनाच धारेवर धरले होते, अण्णा हजारे सर्वप्रथम प्रकाशात आले ते महाराष्ट्रातील युती सरकारमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवल्याप्रकरणी त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्री महादेव शिवणकर यांना त्यांनी धारेवर धरले होते, त्यानंतर नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे देखील अण्णांच्या तडाख्यात सापडले होते, नंतर अण्णांनी देशभरात भ्रष्टाचार विरोधात संघर्ष उभा केला, त्यावेळी अनेक कार्यकर्ते अण्णांच्या सोबत आले. त्यात अरविंद केजरीवाल हा देखील एक होते. अण्णांच्या आंदोलनामुळेच अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण अशी अनेक मंडळी समोर आली. यांनीच पुढे राजकारणात हालचाली केल्या, त्यातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला. योगायोगाने आम आदमी पार्टीला जनतेने साथ दिल्यामुळे आज दिल्लीसह दोन राज्यांमध्ये पक्ष सत्तेतही आहे.
अण्णांच्या आंदोलनाच्या माध्यमातूनच अरविंद केजरीवाल मोठे झाले होते. अण्णांवरच्या विश्वासामुळेच देशभरातील जनतेने केजरीवालांवरही विश्वास ठाकला, मात्र त्या विश्वासाला केजरीवाल आणि त्यांचे सहकारी खरोखरी पात्र ठरले का? याचे उत्तर शोधतांना अनेकदा निराशाच पदरी पडते.
अण्णांनी केजरीवालांवर टीका करतांना केवळ टिकेकरिता टीका केलेली नाही, तर मुद्देसूद टीका केलेली आहे. अश्यावेळी या टीकेला तसेच मुद्देसूद उत्तर केजरीवालांनी देणे अपेक्षित होते, मात्र केजरीवालांकडे काही उत्तर नसावे म्हणूनच त्यांनी पलटवार करण्यासाठी भाजपचा आसरा घेतला असावा असे दिसते.
इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना देशात काहीही घडले तरी त्यांना त्यात विरोधकांचा हात दिसायचा, तसेच आता केजरीवालांविरोधात काहीही घडले तरी त्यांना त्यात भाजपचाच हात दिसतो. त्यामुळेच त्यांनी अण्णांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यातून काही फारसे सध्या होईल असे दिसत नाही, देशातील जनता सुज्ञ आहे, जर केजरीवाल चुकत असतील तर जनता त्यांच्या कांगाव्याला बळी पडणार नाही जनता त्यांना नेमके उत्तर मागणारच .
म्हणूनच केजरीवालांनी भाजपचा आसरा न घेता अण्णांच्या टीकेला मुद्देसूद उत्तर द्यावे भाजपच्या आड लापु नये इतकेच आम्हाला सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply