आता भाजप अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहे – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : ३१ ऑगस्ट – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहलं आहे. दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क धोरणावरुन अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. १० वर्षापूर्वीच्या एका बैठकीचा दाखल या पत्राच्या माध्यमातून अण्णा हजारेंनी केजरीवालांना दिला आहे. मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारेंनी केजरीवालांना लगावला आहे. त्यावर आता अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “भाजपाच्या नेत्यांनी मद्य धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप केला. सीबीआयनं सुद्धा घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं आहे. जनता देखील त्यांचं ऐकत नाही. आता ते अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहे. राजकारणात हे सर्वसाधरण असते.”
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले होते. त्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली होती. मात्र, त्यांच्या या हिंमतीचे अरविंद केजरीवाल यांनी कौतुक केलं आहे. “जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात येतो, तेव्हा कोणत्याही तपासासाठी तयार असलं पाहिजे. मनीष सिसोदियांची सीबीआयने १४ तास चौकशी केली. सीबीआयच्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले. तसेच, तपासादरम्यान, सीबीआयला सिसोदियांच्या घरातील लॉकरमध्ये काहीही सापडले नाही. त्यामुळे ही एकपद्धतीने क्लीन चिटच मिळाली आहे,” असेही केजरीवाल यांनी म्हटलं.
‘‘दिल्ली सरकारच्या नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. एकेकाळी दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती’’, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून खडसावले होते.

Leave a Reply