सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

ओझोन – हर घराचा प्राण

ओझोन म्हटल्यानंतर सर्वात आधी डोळ्यासमोर येतो ते आकाशात १६ ते ३० किमी उंचीवर असणारा “ओझोन” थर. जो सुर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्यास मज्जाव करतो, जवळपास ९०-९९% टक्के अतिनील किरणे ओझोनचा थर शोषून घेतो. ह्यावरून साधारण कल्पना करता येते की ओझोन चा हा थर पृथ्वीवरील सृष्टी साठी किती आवश्यक आहे.. विचार करा ही सुर्याची अतिनील किरणे जर पृथ्वीवर आली तर काय काय दुष्परिणाम होतील.
आफ्रिकेत मालावी देशात काम करीत असताना, आमचा एक सहकारी अतिनील अवरोधक क्रीम लावल्याशिवाय तास दोन तासांसाठी कार्यालया बाहेर येत नसे. कारण काय तर त्याची चामडी अतिसंवेदनशील होती. अतिनील किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या, त्वचा काळी पडणे, सनबर्न डाग पडणे, डोळ्यांची आग होणे अशा परिणामांना सामोरे जावे लागे. तेव्हापासून आमचा सहकारी अतिनील किरणांच्या भितीपोटी बाहेर जाणे टाळत असे.
अतिनील किरणांचे मानकानुसार ३ नॅनो मीटर इतके प्रमाण मानवाला हानिकारक ठरत नाही तर त्यावर असेल तर मात्र प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार, प्रतिकार शक्ती नुसार दुष्परिणाम जाणवतात.
ओझोन वायुची परत (थर) जर हटविला तर अतिनील किरणांच्या माऱ्यामुळे उष्णता वाढेल. अंटार्क्टिका तील बर्फ वितळेल, त्यायोगे समुद्राची पातळी वाढेल. अतिउष्णतेने पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे जिणे असह्य होईल. पर्यावरण नांगी टाकेल आणि संपूर्ण पृथ्वीवरील समतोल ढासळेल.
१६ सप्टेंबर हा दिवस “ओझोन दिवस” म्हणून जगभर साजरा होतो. पण ओझोन वायू फक्त अतिनील किरणांना रोखुन पृथ्वीवरील पर्यावरणापर्यंत मर्यादित नाही तर मानवी जीवनातील दुषित हवा, पाणी शुद्धीकरण करण्याचे एक साधन आहे. घरातील घाण वास , रोग्यांमुळे येणारा कुबट वास, किंवा घरातील किटाणू मारण्याचे बलशाली तंत्र आहे.
ओझोन वायू खरे म्हणजे निसर्गाला शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावणारा वायु. पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान हवेत एक गवताच्या ताज्या गंजी सारखा वास असतो. तोच् हा ओझोन. ही वेळ पुजा, ध्यानधारणा, ब्रम्हमुहूर्त साठी अग्रगण्य मानली जाते. पहाटे पहाटे ओझोन चे कार्य हे हवेचे शुद्धीकरण करण्याचे असते.
आता ओझोनच्या रासायनिक संरचना आणि रासायनिक प्रक्रियेत न जाता आपण त्याच्या घरगुती फायद्यांवर भर देवु या.

हवा शुद्धीकरण

ओझोन वायू श्वासोच्छवासाद्वारे घेण्यास मज्जाव असला तरी बंद खोलीत योग्य प्रमाणात ओझोन सोडला तर खोलीतील हवेचे शुद्धीकरण होते. बॅक्टेरिया, व्हायरसेस, ह्यांचा समुळ नायनाट होतो. खोलीत असणारे घाण वास, बेड रिडन रोग्यांमुळे घरात एक विचित्रसा कुबट वास असतो. त्या वासाचे समुळ उच्चाटन करण्याची क्षमता ओझोन वायु मध्ये असते. आणि घरात एक ताजेपणा टिकवून धरण्याची क्षमता ओझोन मध्ये असते. ओझोन निर्मिती यंत्राची किंमत खुप जास्त असल्याने काही शहरात घर शुद्धिकरणासाठी ओझोन वायू निर्मिती यंत्रे भाडेतत्वावर चालवणाऱ्या संस्था आहेत.
कोरोना काळात ओझोन वायू ने घर निर्जंतुक करणारे बरेच महाभाग बघितले आणि त्यांच्या घरी खरोखर कोरोनाने प्रवेश केला नाही. ह्याचे निरिक्षण स्पेन मध्ये केले गेले आणि त्याचे ओझोन कोरोनासारख्या किटाणूंवर मात करण्यास सक्षम आहे. ह्याचे टेस्ट सर्टिफिकेट दिले आहे. कोरोना काळात बऱ्याच रूग्णालयात ओझोन निर्मिती यंत्रे लावण्यात आली आहेत.
एका डेयरी च्या टाकीमधून नासल्या दुधावर प्रक्रिया करत असताना टाकीतून अतिशय सडका वास बाहेर पडायचा. आजुबाजुच्या लोकांनी तक्रार करणे सुरू केले. अशा टाकीमध्ये जेव्हा ओझोन वायुचा योग्य प्रमाणात मारा केला गेला आणि समस्येचे कायम निराकरण झाले. इतका प्रभावी हा उपाय आहे.
ओझोन वायुची महत्ता जशी घरगुती कामांसाठी तसेच ऑपरेशन थिएटर प्रत्येक शस्त्रक्रिये अगोदर निर्जंतुक केले जाते. सद्य परिस्थितीत ही प्रक्रिया अतिशय जटिल आहे आणि वेळ पण खूप लागतो. अशा परिस्थितीत जर ऑपरेशन थिएटर मध्ये ओझोन यंत्र लावल्यास वेळ देखील फार कमी लागेल व शुद्धीकरण प्रक्रिया सुलभ होईल. पण आजतागायत ही उपाय योजना कोणी करत नाही ह्याचे वैषम्य वाटते.
लहान बाळांच्या दुधाच्या पाण्याच्या बाटल्या निर्जंतुक करण्याची हमखास हमी म्हणजे ओझोन वायू. शंभर टक्के खात्री. म्हातारे आईवडील ह्यांचे साठी हा फार फायद्याचा ठरतो.
वृद्धाश्रम, इस्पितळात, घरी असणारे बेड रिडन रोगी ह्यांचे साठी विशेषकरून अतिशय फायद्याचे ठरते. निर्जंतुक करणे आणि मुख्य म्हणजे खोलीतील घाणेरडा कुबट वास घालवण्यासाठी ह्याचा खुप जास्त उपयोगी ठरते. मुलांच्या व वृद्धांच्या डायपरचा वास भारी असह्य होतो. असला घाणेरडा वास घालविण्याची क्षमता ओझोन वायू मध्ये आहे.

जलशुद्धीकरण

ओझोन मुळे पाण्याचे शुध्दीकरण सुलभ रित्या होते. ओझोन वायू पाण्यातील बॅक्टेरिया, व्हायरसेस मारण्यास मदत करते. रासायनिक प्रक्रियेने पाण्यास शुद्ध करण्याची प्रक्रिया जटिल असते. कमी जास्त प्रमाणात रसायन पडल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता भरपूर असते अशा वेळी पाणी शुद्धीकरण करण्याचा नैसर्गिक सुलभ उपाय म्हणजे ओझोन वायू ने पाण्याचे शुध्दीकरण. शुन्य दुष्परिणाम.
त्याचप्रमाणे घरी येणाऱ्या भाज्या कुठुन कुठुन कशा कशा येतात आपल्याला माहिती नसते. मुंबईत तर टॉयलेट कक्षात ठेवून भाज्या स्थानांतरित करण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशावेळी आपल्या घरात येणारी भाजी शुद्ध करण्याची प्राथमिक गरज उद्भवते. अशावेळी तोडगा म्हणजे ओझोन वायू. भाज्या, फळे, स्वयंपाक बनविण्याअगोदर तांदुळ, डाळी निर्जंतुक करण्यासाठी ओझोन चे उपकार अपार आहेत.
ओझोन वायू ने शुद्ध केलेले पाणी मानवी जखमा धुण्यासाठी वापरल्यास जखमा लवकर भरून येतात असा वैद्यकीय अनुभव आहे.

मानवी शरीरात रोगराई पसरते त्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे हवा, पाणी, अन्न. जर हे तीन ही शरीरात घेताना शुद्ध स्वरूपात नियमित घेतले तर जीवनाचे निरोगी दिवस वाढण्यास निश्चित मदत होईल. ओझोन वायु हा त्यावर रामबाण उपाय आहे. ओझोन वायुची प्रक्रिया नैसर्गिक सुलभ आहे. आपल्याला डाळ, तांदूळ मिळतात ते रासायनिक प्रक्रियेतून जातात. जसे पॉलिश्ड डाळ, तांदूळ वगैरे त्यामुळे शिजविल्यानंतर येणारी अन्नाची चव ही नैसर्गिक चवीपेक्षा वेगळी असते तर ओझोन वायू च्या शुद्धीकरणानंतर ही चव नैसर्गिक चवीच्या लगत येते व जास्त चविष्ट बनते, असा लोकांचा अनुभव आहे.
असा हा गुणी ओझोन वायू अतिनील किरणांना रोखण्यापासून ते पोटातील अन्नाच्या पर्यंत अतिशय उपयुक्त असे आहे.

ओझोन वायू इतर अनेक जागी वापरला जातो. ओझोन वायू कुठे कुठे वापरला जातो ही संपूर्ण माहिती द्यायची झाल्यास रकाने च्या भरतील. तुर्तास आपण फक्त घरगुती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणून हवा, अन्न, पाणी आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील उदाहरण दिले आहेत.

भाई देवघरे

Leave a Reply