मजुराचे अपहरण करून केली हत्या

नागपूर : ३० ऑगस्ट – मजूर घरून निघाला थेट ठेकेदाराकडे. कारण त्याला ठेकेदाराकडून पैसे आणायचे होते. परंतु तो ठेकेदाराकडे पोहोचलाच नाही. सोनेगाव परिसरातूनच बेपत्ता झाला. त्याची शोधाशोध झाली. परंतु तो मिळाला थेट जयताळय़ात. तेही नाल्यात मृतावस्थेत. ही घटना पुढे आल्यानंतर एकच खळबळ माजली. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सोमवारी एक युवक जेव्हा जयताळा बाजाराजवळील नाल्याजवळ लघुशंकेसाठी गेल्यानंतर त्याला एक मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उजेडात आली. भोजराज रामेश्वर डोमणे (वय ३0, शहाणे ले-आऊट, सोनेगाव) असे मृतकाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, घटना पुढे आल्यानंतर यासंदर्भातील माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. घटनेची गंभीरता बघता पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने मृतदेहाची ओळख पटली. मृतक हा सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. परिणामी, घटनेसंदर्भात सोनेगाव पोलिसांना सूचना देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी २७ ऑगस्ट रोजी तान्हा पोळय़ाच्या रात्री दहा वाजता भोजराज याने त्याची पत्नी ममता हिला ठेकेदाराकडून कामाचे पैसे घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरीच परतला नाही. बराचवेळ झाल्यानंतर पत्नीने फोन करून बघितले असता मोबाईल सतत बंद येत होता. त्यानंतर पत्नीने पती भोजराज बेपत्ता असल्याची तक्रार रविवार, २८ ऑगस्ट रोजी सोनेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी अर्थात सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रतापनगर हद्दीतील जयताळा बाजार चौकजवळील प्लॉट नं. २५ व २६, गव्हर्मेंट हाऊसिंग सोसायटीच्या मोकळय़ा मैदानात एका सिमेंटच्या पाईपमध्ये गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत भोजराज डोमडे याचा मृतदेह आढळला. भोजराजला अत्यंत विकृत पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. त्याच्या मानेवर व डोक्यावर जड वस्तूने मारल्याच्या जखमा होत्या. भोजराजचे अपहरण करून त्याला जीवानिशी ठार करण्यात आले. वास्तविक, सोनेगावच्या पोलिस ठाणे हद्दीतच भोजराजची चाकूने भोसकून हत्या झाली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जयताळा बाजारातील नाल्यात आणून फेकून दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना पुढे आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. भोजराजची हत्या कोणी व का केली? याचा सोनेगाव आणि प्रतापनगर पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणी फिर्यादी अनिरुद्ध ऊर्फ अनिल रामेश्वर डोमडे (वय ४0, रा. पन्नासे ले-आउट, सोनेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply