अब्दुल सत्तारांचा टीईटी घोटाळ्यात संबंध, माझ्याकडे त्याचे पुरावे – अंबादास दानवे

मुंबई : ३० ऑगस्ट – शिवसेनेचे विधानपरिषदेतील नेते अंबादास दानवे यांनी टीईटी घोटाळ्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. अब्दुल सत्तारांचा टीईटी घोटाळ्यात संबंध असून माझ्याकडे त्याचे पुरावे असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या नेत्यांना हे शिंदे सरकार संरक्षण देते आहे. हे दुर्देवी असल्याचंही ते म्हणाले.
“टीईटी घोटाळ्यात अनेकांना परीक्षा न देताच टीईटीचे प्रमापत्र मिळाले, अशी अनेक प्रकरणं आहेत. या घोटाळ्यात काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होतो. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना पुन्हा नोकरीवर घेतले. राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संस्थेतील १२ लोकांची या घोटाळ्यात नावे आहेत. त्याचा रेकॉर्ड मी विधानपरिषेदत मांडला होता. मात्र, मला समाधानकारक उत्तरं मिळाली नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
“अब्दुल सत्तार म्हणाले होते की माझ्या मुलीने कोणाताही पगार उचललेला नाही. मात्र, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या नेत्यांना हे शिंदे सरकार संरक्षण देते आहे. हे दुर्देवी आहे.”, असेही ते म्हणाले.
ऑक्टोबर २०२१मथ्ये पुणे पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासामध्ये हा घोटाळा उघड झाला होता. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क श्रेणीतील पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१पर्यंत सरकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर येऊ लागलं. पुणे सायबर पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केला. यामध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही नावं समोर येऊ लागली. दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करताना अनेक गैरप्रकार समोर आले. पेपर फुटल्याचा प्रकार यामध्ये घडला नसला, तरी पेपर तपासणी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून गुण वाढवणे किंवा बनावट प्रमाणपत्र देणे असे प्रकार यात घडल्याचं दिसून आलं.

Leave a Reply