१७ ऑक्टोबरला होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक

नवी दिल्ली : २९ ऑगस्ट – अनेकदा लांबणीवर गेलेली बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत रविवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आह़े
या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबरला काढण्यात येणार असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर रोजी सुरू होईल़ ३० सप्टेंबरला त्याची अंतिम मुदत संपुष्टात येईल, असे काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणूक यंत्रणेचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी कार्यसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम एकमताने मंजूर करण्यात आला. वैद्यकीय तपासणीसाठी सध्या परदेशात असलेल्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे (ऑनलाइन) रविवारी झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सोनियांबरोबर राहुल आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या.
काँग्रेस कार्यसमितीने गेल्या वर्षी निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ही निवडणूक लांबणीवर गेली़ आता उमेदवारी अर्ज छाननीची तारीख १ ऑक्टोबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर असेल. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी होईल. मतमोजणी आणि निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. ‘‘मिस्त्री यांनी मांडलेला निवडणूक कार्यक्रम कार्य समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. अशा प्रकारे लोकशाही प्रक्रियेतून पक्षांतर्गत विशेषत: अध्यक्षपदाच्या निवडणुका नियमितपणे घेणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे,’’ असे रमेश म्हणाले.
राहुल गांधींनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार आहे.
पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची यापूर्वीची निवडणूक २००० च्या नोव्हेंबरमध्ये झाली होती. सोनिया गांधी १९९८ पासून सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्षपदी होत्या. २०१७ ते २०१९ अशी दोन वर्षे राहुल गांधींनी ही धुरा सांभाळली होती. त्यावरून काँग्रेसमध्ये घराणेशाही असून, गांधी घराण्याचे काँग्रेसवर संपूर्ण नियंत्रण असल्याची टीका भाजपतर्फे सातत्याने केली जाते.
सोनिया गांधींना २०२० मध्ये पत्र पाठवून पक्षात सर्वंकष सुधारणा आणि सर्व स्तरांवर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी केली होती. पक्षाच्या या ‘जी-२३’ गटातील नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी दिलेल्या राजीनामापत्रात राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. राहुल यांनी पक्षाची सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत निवडणुकांतील अपयशाला तेच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वाढत्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीमुळे निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले जाते.
काँग्रेसने ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो यात्रे’वर लक्ष केंद्रित केल्याने अध्यक्षपदाची निवड काही आठवडे उशिरा होत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होईल. दोन दिवसांनी, १९ ऑक्टोबरला नवनिर्वाचित अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणूक यंत्रणेचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी दिली.
’२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत.
’पक्षात सर्वंकष सुधारणा आणि सर्व स्तरांवर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती.
’‘जी-२३’ गटातील नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी दिलेल्या राजीनामापत्रात राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते.

Leave a Reply