मुंबई : २९ ऑगस्ट – मुंबईतील परळ परिसरात आगीची धक्कादायक घटना घडली आहे. परळ येथील मुख्य चौक परिसरातील एका पेट्रोल पंपानजीक जमिनीतून अचानक आगीचा भडका उडाला आहे. संबंधित परिसरातून मुंबई महानगर पालिकेची गॅस पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे हीच पाईपलाईन फुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ही घटना घडताच पेट्रोल पंपावरील काही कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. परिसरात मोठे धुरांचे लोट निर्माण झाले असून सावधगिरीचा उपाय म्हणून परिसरातील दुकानं बंद करण्यात आली आहेत. तसेच संबंधित दुकानांचा वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.
या परिसरातील काही शाळा नुकत्याच सुटल्या आहेत. त्यामुळे शाळेसमोर विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. स्थानिक आमदार अजय चौधरीदेखील घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे.
सुरुवातीला केवळ पाण्याच्या फवाऱ्याने आग विझवण्यास अनेक अडथळे येत होते. ही आग कमी प्रमाणात लागली असली तरी या घटनेचं गांभीर्य मोठं आहे, त्यामुळे संबंधित घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. महानगरपालिकेची गॅस पाईपलाईन फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.