माझ्या आयुष्यातील आनंदाचा ‘रामक्षण’ – प्रकाश एदलाबादकर

संस्कार भारतीचे अध्वर्यू आणि संरक्षक ॠषितुल्य बाबा योगेन्द्रजी यांच्या देहावसानानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारी ,विदर्भ प्रांत स्तरावरील एक सभा नागपुरात झाली होती. बाबा योगेन्द्रजींच्या, नागपूर विदर्भाशी निगडित आठवणींच्या छायाचित्रांची एक चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
संस्कार भारतीचा १७ वा अखिल भारतीय कलासाधक संगम नागपूरला १९९८ साली संपन्न झाला होता.त्याची काही छायाचित्रे या चित्रफितीत होती.बरेच दिवसांपासून कार्यकर्ते व मीही या छायाचित्रांच्या शोधात होतो. आमचे एक कार्यकर्ते मुकुल मुळे याचेकडे तो संग्रह प्रयत्नांती सापडला.मुळात हा संग्रह आपल्याकडे आहे याची मुकुललाही कल्पना नसावी.परंतु त्याचे वडील कै.अनंतराव मुळे यांनी तो जपून ठेवला होता.
या कलासाधक संगमाच्या स्मरणिकेचे संपादन मी केले होते.प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व दूरदर्शनवरील
‘ रामायण ‘कार श्री.रामानंद सागर यांचे हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन झाले होते.महालातील चिटणिस पार्क मैदानावर हा समारंभ डिसेंबर १९९८ मध्ये झाला होता. ‘ महाभारत ‘ मालिकेतील कृष्ण नितीश भारद्वाजही यावेळी उपस्थित होते.
आज मुकुलकडे जाऊन त्या क्षणाचे छायाचित्र पहिले आणि अनेक आठवणींना उजाळा मिळाला. रामानंद सागरांसोबत व्यासपीठावर असणे हा भाग्ययोग नव्हे काय?

प्रकाश एदलाबादकर ,नागपूर.

Leave a Reply