नंदनवन हद्दीत कॊटुंबिक वादातून एकाची हत्या

नागपूर : २९ ऑगस्ट – शहरातील नंदनवन पोलिस ठाणे हद्दीत चुलत भावाने चुलत भावाची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली. वडील हे मुलाच्या घरी न राहता पुतण्याच्या घरी राहत असल्याचा राग मुलाच्या डोक्यात होता. त्यामुळे मुलाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चुलत भावाचा गळा चिरून खून केला. ही थरारक घटना हिवरीनगर येथे घडली. शुभम पांडुरंग शेंडे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
आरोपी हिमांशू शेंडे (वय २२) हा त्याच्या वडिलांना सतत त्रास देत होता. पुरुषोत्तम शेंडे हे आरोपी हिमांशूचे याचे वडील आहेत. मुलाच्या त्रासापोटी दोघांमध्येही सतत बिनसत रहायचे. मुलासोबत होणार्या वादामुळे हिमांशूचे वडील अर्थात पुरुषोत्तम शेंडे हे त्यांचा पुतण्या शुभम पांडुरंग शेंडे (वय २७) याच्या घरी हिवरीनगर येथे राहायला गेले होते. येथेही हिमांशूचा त्रास संपलेला नव्हता. हिमांशू जेव्हाकधी चुलतभावाकडे यायचा तेव्हा बापलेकांमध्ये वाद होत होते. यावेळी चुलत भाऊ फिर्यादी भूषण पांडुरंग शेंडे (वय २४) हा मध्यस्थी करीत होता. दरम्यान, पोळय़ाच्या पाडव्याच्या दिवशी आरोपी हिमांशूने नेहमीप्रमाणे वडील पुरुषोत्तम यांच्याशी वाद घातला. यावेळीदेखील भूषण हा मध्यस्थीसाठी आला. ही वेळ टळल्यानंतर संध्याकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास आरोपी हिमांशू व त्याचा मित्र आरोपी आशिष अमृत महल्ले (वय २२, दोन्ही रा. नवी शुक्रवारी) यांनी मिळून फिर्यादी शुभम याला नंदनवन हद्दीतील प्लॉट नंबर ४, हिवरी ले-आऊट, द सलुनवाला दुकानाच्यासमोर गाठले. त्यानंतर त्याच्यासोबत भांडण केले. वाद वाढत गेला आणि भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपीने थेट त्याच्या गळय़ावर गळय़ावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि पसार झाले. या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply