पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुंबई : २८ ऑगस्ट – पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागात पर्यटनासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाबळेश्वर येथील राजभवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
पत्रकारपरिषदेस जिल्हधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपटी ते तापोळासाठी १५० कोटी आणि कास ते बामनोलीसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. त्यासाठी एमटीडीसी आणि एमआयडीसीच्या विभागीय अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.”
ते पुढे हे देखील सांगितले की, “महाबळेश्वर येथे पार्किंगची समस्या असून दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच महाबळेश्वरच्या सुशोभीकरणासाठी उर्वरित निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सोळशी येथे साडे सहा टीएमसी धरण बांधण्यासाठी सर्व्हे करण्याच्याही सूचना देण्यात आल्या असून, हे पाणी दुष्काळी भागासाठी देण्यात येणार आहे. तसेच प्रतापगडाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात आला असून प्रतापगडसाठी सुकानु समितीही नेमली आहे. दुर्गम भागातील लोक आणि विद्यार्थ्यांसाठी छोट्या मिनी बस देण्यात येणार आहेत. बोट क्लबला रीतसर परवानगी देणे, बार्ज खरेदी करणे, बेल एअरसाठी ३ कोटीचा निधी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी, इको सेन्सिटिव्ह झोन मधील गावांचा विकास, महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी साठी तज्ञ लोकांची नेमणूक करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत.” असे देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply