19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू जाणार राज्याचे हिवाळी अधिवेशन

मुंबई : २६ ऑगस्ट महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन आज संपुष्टात आलं. यानंतर आता सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. पुढचं हिवाळी अधिवेशन हे सोमवार 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होईल. आतापर्यंत महाराष्ट्राची जवळपास सगळीच हिवाळी अधिवेशनं ही नागपूरला झाली आहेत, पण महाविकासआघाडी सरकार याला अपवाद ठरलं.
नागपूरमध्ये शेवटचं हिवाळी अधिवेशन 2019 साली झालं होतं. यानंतर कोरोनाचं संकट आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होऊ शकलं नाही.
नागपूर पॅक्टनुसार राज्यातलं तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावं लागतं, पण महाविकासआघाडी सरकारला 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही. नागपूर पॅक्टचा सन्मान म्हणून यावर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणीही भाजपने केली होती, पण तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी प्रवासाला परवानगी दिली नव्हती, म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईमध्येच झालं.
नागपूर पॅक्ट (करार) नुसार नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश करताना 1953 साली नागपूर पॅक्ट करण्यात आला होता.

Leave a Reply