डॉक्टरांचे लॅपटॉप आणि मोबाईल चोरणारा आरोपी जेरबंद

नागपूर : २६ ऑगस्ट – कोरोना संक्रमणाच्या काळात अनेकजण संकटात सापडले. अशातच आर्थिक संकटात सापडलेल्या एका तरुणाने थेट चोरीचा मार्ग पत्करला. उच्चशिक्षित असतानाही रोजगाराअभावी त्याने चोरीची सुरुवात केली. त्याला यश येत असताना तो सराईत झाला. परंतु, कधीनाकधी चोरी पकडलीच जाते, तसेच त्याच्यासोबत झाले अन् तो थेट रंगेहातच सापडला. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे लॅपटॉप किंवा मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीसोबत तो काम करायचा. अनेक राज्यात त्याने गुन्हे केले होते. तमिळ सेलवान कन्नन (२५, तिरुवरू, तमिळनाडू) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तमिळ कन्नन हा उच्चशिक्षित असून त्याने अर्थशास्त्रात बीए केले आहे. कोविड संक्रमण सुरू झाल्यानंतर तो आर्थिक अडचणीत सापडला. कोरोना काळात शासकीय रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यासाठी बेडही मिळत नव्हते. अनेकांना उपचाराअभावी रुग्णालयाच्या दारापुढे प्राण सोडावे लागले. अशा परिस्थितीत रुग्णांनी भरगच्च असलेल्या सरकारी रुग्णालयातील घोर निष्काळजीपणा पाहून कन्ननने संधी साधली. यावेळी तमिळ कन्नन याने तेथून डॉक्टरांचे लॅपटॉप किंवा मोबाईल चोरण्यास सुरुवात केली. तमिळने दिल्ली, म्हैसूर, बंगळुरू, चेन्नईसह अनेक मोठय़ा शहरांमध्ये अशाप्रकारच्या चोर्या केल्या. चोरीचा माल तो दिल्लीत विकायचा. मागील दोन वर्षांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता. मागील आठवड्यात त्याने दिल्लीतील एम्समधील दोन डॉक्टरांचे लॅपटॉप चोरले. त्यांची विक्री करून तो चेन्नई येथे पोहोचला. त्यानंतर तो बुधवारी सकाळी नागपुरात आला. तमिळ हा त्यानंतर बुधवारी संध्याकाळी मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील बॉईज होस्टेलमध्ये पोहोचला. यावेळी चौकीदाराला तो बाहेरचा माणूस असल्याने त्याने त्याला पकडले. पोलिसांना त्याची माहिती दिली. तमिळच्या टोळीत प्रभास नावाच्या तरुणासह तीन-चार सदस्य आहेत. ते वेगवेगळय़ा शहरात फिरून चोरी करतात. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तमिळ कन्ननला पोलिस कोठडीत ठेवण्याची सुनावली आहे.

Leave a Reply