संपादकीय संवाद – मराठी भाषेच्या विकासासाठी प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध व्हायला हवे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी विनंती केली असल्याचे वृत्त आज काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांची ही मागणी स्वागतार्हच म्हणायला पाहिजे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अजूनही पूर्ण का होत नाही? यावरही विचार व्हायला हवा.
मराठी ही प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते, अगदी ज्ञानेश्वरांच्या आधी चक्रधर स्वामींच्या काळापासून ही भाषा अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात, या भाषेत विपुल साहित्य निर्मिती झाली आहे. असे असले तरी या भाषेला अजूनही अभिजात दर्जा मिळाला नाही हे दुर्दैवी वास्तव नाकारता येत नाही.
मराठी भाषेवर अशी वेळ का यावी? याचा विचार आपल्या मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मराठी भाषिकाने करायला हवा, असे आम्हाला सुचवावेसे वाटते. मराठी भाषेचा किती मराठी माणसांना खरोखरी अभिमान आहे? किती मराठी माणसं आजही आग्रहाने मराठीत बोलतात? आणि मराठी लिहितात? मराठी बोलणे आणि लिहिणे जाऊ द्या आम्ही आपली स्वाक्षरीसुद्धा इंग्रजी भाषेतच करतो. आज महाराष्ट्रात पूर्वी मोठ्या संख्येत असलेल्या मराठी शाळा बंद पडत आहेत, अनेक शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवलाही जात नाही. त्यामुळे नव्या पिढीला मराठीचा फारसा गंधही नाही. आपण परप्रांतात गेलो तर तिथले मूलनिवासी आपल्याच भाषेत बोलण्याचा आग्रह धरतात, असा आग्रह महाराष्ट्रात किती लोक धरतात? आज महाराष्ट्राच्या रस्त्यावर मराठी माणूस हिंदीत बोलण्यातच धन्यता मानतो. घरात मुलांशी इंग्रजीत बोलण्याचे आम्हाला कौतुक वाटते. मग मराठी वाढणार कशी?. आणि ती अभिजात दर्जा मिळणार कशी? मराठीत आजही अनेक चांगले लेखक आहेत, मात्र त्यांचे लेखन प्रकाशित करायला मराठी प्रकाशक नाहीत, आणि ती पुस्तके विकत घायला वाचकही नाहीत, राज्य सरकार ग्रंथालयांना अनुदान देते, मात्र गेल्या काही वर्षांपासून ते अनुदानही मिळत नाही, मग मराठी भाषा वाढणार कशी?
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येक मराठी माणसाने मराठीचे संवर्धन करण्यासाठी मी मराठीतच बोलणार, मराठीच वाचणार आणि मराठीच लिहिणार असा संकल्प करायला हवा, तरच मराठी भाषा विकसित होऊन अभिजात भाषेचा दर्जा मिळवू शकेल. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध व्हायला हवे, इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply