‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ – राज ठाकरेंनी मनसेसाठी आणली नवी घोषणा

पुणे : २५ ऑगस्ट – मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे यांची मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागलाय. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्यानं मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे. या मुद्यावर मनसेला पुन्हा सूर गवसणार का याची उत्सुकता आहे.
शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईत दोन दिवस पदाधिकारी बैठक आणि मेळव्यानंतर आज ते पुण्यात असणार आहेत.पुण्यातून आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आगामी निवडणुकांपूर्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेनं नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ असं मनसेचं नवं घोषवाक्य असणार आहे.. दरम्यान मनसेच्या या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्त्वाचा मुद्दा जोडण्यात आला आहे. यापूर्वी पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरे यांनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य दिलं होतं.
राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत होते. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढली होती. आता राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply