केजरीवालांनी बोलावलेल्या बैठकीला काही आमदारांची दांडी, दिल्लीत ऑपरेशन लोटस सुरु?

नवी दिल्ली : २५ ऑगस्ट – आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. या कारवाईनंतर भाजपावर सातत्याने टीका करणाऱ्या आपने भाजपाकडून दिल्लीमधील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच हे सरकार पाडण्यासाठी आपच्या आमदारांना २० ते २५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे, असा दावादेखील आप पक्षाने केला आहे. दरम्यान या घडामोडी घडत असताना आप पक्षाने आज सर्व आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर दिल्लीतील सरकार स्थिर असून कोणताही आमदार फुटणार नाही, असा विश्वास आप पक्षाने व्यक्त केला आहे. असे असले तरी या बैठकीला काही आमदार अनुपस्थित होते. या आमदारांशी फोन कॉलद्वारे चर्चा झाल्याचे आप पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला ६२ पैकी ५३ आमदार उपस्थित होते. तर अनुपस्थित आमदारांपैकी काही आमदारांशी संपर्क करण्यात आल्याचे आप पक्षाकडून सांगण्यात आले. यापैकी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष सध्या विदेशात आहेत. मनिष सिसोदिया हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, असे आप पक्षाकडून सांगण्यात आले. तर उर्वरित आमदारांशी अरविंद केजरीवाल यांनी फोनवरून चर्चा केली असून त्यांनी सरकार पाडण्यासाठी आम्हाला भाजपाच्या लोकांनी संपर्क साधला होता, असे सांगितल्याची माहिती आपच्या प्रवक्त्याने दिली.
आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील चार आमदारांना भाजपमध्ये सामील व्हा अन्यथा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लादलेल्या खोट्या खटल्यांना तोंड देण्यास तयार राहा, असे लाचेचे प्रलोभन आणि धमकी भाजपतर्फे देण्यात आल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला. मदारांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी २० कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जर त्यांनी इतर आमदारांना सोबत आणले तर २५ कोटीही देण्याचे प्रलोभन दाखवले होते. जर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारून भाजपमध्ये जाणे नाकारले, तर मात्र उपमुख्यमंत्री सिसोदियांप्रमाणे त्यांना ‘सीबीआय’, ‘ईडी’च्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी धमकीही भाजपच्या या नेत्यांकडून देण्यात आली होती, असा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply