कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकेला आदिवासी शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप

चंद्रपूर : २५ ऑगस्ट – कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या विदर्भ कोंकण बँकेच्या जिवती तालुक्यातील शाखेला संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले आहे. श्रमिक एल्गार, बिरसा संघटना व ऑफ्रोट संघटनांच्या संयुक्त नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार २४ तास तत्पर आहे, असे जाहीर केले. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडताना दिसत आहे .
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम माणिकगड पहडावरील जिवती तालुक्यातील काकबन, भुरियेसापूर, टाटाकोहाड, सिंगरपठार, शेडवाही येथील वनहक्क पट्टेधारक कोलाम आदिवासी शेतकरी पीक कर्जासाठी आंदोलन करत आहे. मात्र, बँकेचे व्यवस्थाक दिडवलकर यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. बँकेला सर्व कागदपत्रे देऊनही पीककर्ज दिल्या जात नाही. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून पीककर्ज मिळेपर्यंत बँकेतून जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने बँक व्यवस्थापकांची तारांबळ उडाली. व्यवस्थापकांनी चंद्रपूर येथील त्यांचे अधिकारी खाडे यांना दूरध्वनी करून प्रकरणाचे गांभीर्य कळविले. खाडे यांनी चंद्रपूर येथून जिवतीला येऊन प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली. मात्र, पीककर्ज न दिल्यास बँकेसमोर बेमुदत आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Leave a Reply