शिवनाथ एक्सप्रेसचे २ डबे रुळाखाली उतरले

नागपूर : २४ ऑगस्ट – कोरबाहून नागपूरकडे येत असलेल्या शिवनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे सकाळी डोंगरगढ येथे अचानक रुळाखाली आले. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना खाली उतरवले आणि इतर डब्यात त्यांची व्यवस्था केली. ही रेल्वेगाडी नागपूरच्या इतवारी स्थानकावर तब्बल ९ तास १९ मिनिटे उशिरा पोहोचली. याच गाडीत नागपुरातील प्रवासी होते.
शिवनाथ एक्स्प्रेस महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची गाडी आहे. पूर्वी ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकाहून सुटायची. आता ही गाडी इतवारी रेल्वे स्थानकाहून सुटते. रात्री सुटून पहाटे नियोजित स्थळी पोहोचत असल्याने नागपुरातील प्रवासी शिवनाथला प्राधान्य देतात. २७ जून २0२२ ला याच गाडीचे दोन डबे रुळावरून घसरले होते. रेल्वे अपघाताची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी भगत की कोठी एक्स्प्रेसचा गोंदियाजवळ अपघात झाला होता. दोन्ही घटनेत जीवित हानी झाली नसली तरी अपघातामुळे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने अपघातग्रस्त शिवनाथ एक्स्प्रेसच्या प्रवाशांना राजनांदगाव स्थानकावर पाण्यासह इतर सुविधा दिली. त्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. दरम्यान, नागपूर-बिलासपूर मार्गावर १३0 किमीच्या गतीने गाड्या चालविण्याला मंजुरी आहे. तर दुसरीकडे नागपूर-दुर्गदरम्यान तिसर्या मार्गाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसाने रुळाजवळील माती सैल होत चालली. याचा परिणाम रेल्वे मार्गावर होत असून, अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply