शिंदे गटातील आमदारांनी आम्हाला धक्काबुक्की करत आई-बहिणींवरून शिवीगाळ केली – अमोल मिटकरी

मुंबई : २४ ऑगस्ट – पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत आहेत. ‘५० खोके, एकदम ओक्के’ यासारख्या घोषणा देऊन महाविकास आघाडीनं विधानसभा परिसर दणाणून सोडला आहे. यानंतर आज सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीदेखील याच ठिकाणी आंदोलन केलं आहे. त्यांनी करोना काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील याच परिसरात घोषणाबाजी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. या घटनेचे व्हिडीओ समोर आले असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील आमदारांनी आम्हाला धक्काबुक्की करत आई-बहिणींवरून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिटकरी म्हणाले की, “आज सत्ताधारी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. काल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक झाली होती. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यासाठी मविआचे सर्व आमदार विधानभवन परिसरात जमा झाले होते. आम्ही आंदोलन करत असताना शिंदे गटातील एका शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आई-बहिणींवरून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारे लोकं आहोत, पवारसाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही.”
अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, “विरोधीपक्ष म्हणून सरकारला जाब विचारणं, हे आमचं काम आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आम्ही “५० खोके, एकदम ओक्के” बोललो की यांच्या जिव्हारी लागतं. तेही आम्हाला बेईमान वगैरे म्हणातात. अशा प्रकारे टीका करण्याचा अधिकार त्यांना आणि आम्हालाही आहे. पण आंदोलन करत असताना ते मारहाण करत असतील आणि आई-बहिणींवरून शिवीगाळ करत असतील तर, ही बाब महाराष्ट्राला अशोभनीय आहे.”

Leave a Reply