तुम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची तयारी प्रत्येकाची असते – उदय सामंत

मुंबई : २४ ऑगस्ट – विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे चांगलंच तापलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची तयारी प्रत्येकाची असते” असे म्हणत सामंत यांनी विरोधकांच्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे.
वादाला स्वत: सुरुवात करायची आणि त्याला घोषणांनी प्रत्युत्तर दिल्यावर अंगावर जायचं, हे योग्य नसल्याचं सामंत विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. विरोधक महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. त्यांची ही दादागिरी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिल्याची टीका सामंत यांनी केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून देण्यात येत असलेल्या घोषणा खोट्या आहेत. आम्ही घोषणा दिल्यावर एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? असा सवाल सामंत यांनी विरोधकांना केला.
सत्ताधारी आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावर बोलताना “प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देणं आमची जबाबदारी नाही” असे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात शिंदे गट आणि भाजपाच्या सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जे बोललं जात आहे ते योग्य नसल्याचे सामंत यावेळी म्हणाले. वैयक्तिक टीका करणं महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही सावंत म्हणाले.

Leave a Reply