कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, आम्हीच धक्काबुक्की केली – भरत गोगावले

मुंबई : २४ ऑगस्ट – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी बराच वेळ गदारोळ पाहायला मिळाला. या गोंधळाला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत असताना शिंदे गटाचे प्रतोद असलेले आमदार भरत गोगावले यांनी मात्र आम्हीच धक्काबुक्की केली असं स्पष्टपणे म्हटलं आहे.
हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.
गोगावले म्हणाले की, आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला. कोरोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल परब यांची वस्तुस्थिती आम्ही मांडली. आमचं आंदोलन झाल्यानंतर आम्ही पायऱ्या रिकाम्या केल्या असत्या. पण आम्ही बोलत असतानाच गोंधळ घालत लक्ष विचलित करायचं हा कोणता प्रकार आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही, असं गोगावले म्हणाले. अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे असंही गोगावले म्हणाले.
आमदार दिलीप लांडे म्हणाले की, आम्ही लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीनं करत होतो. खरी परिस्थिती आम्ही लोकांसमोर ठेवत होतो. त्यांचे कपडे उतरले जात होते, ते त्यांना नको होतं, त्यामुळं त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असं लांडे यांनी म्हटलं. यात कुणीही कुणाला धमकावलेलं नाही, विरोधकांप्रमाणे आम्हालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जो कुणी अंगावर येईल, त्याला शिंगावर घेतलं जाईलच, असं ते म्हणाले.

Leave a Reply