अस्लम शेख यांनी एक हजार कोटींचा घोटाळा केला – किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : २३ ऑगस्ट – महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अँक्शन आले आहेत. काँग्रेसचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अस्लम शेख यांनी एक हजार कोटींचा घोटाळा केलाय, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. बरं सोमय्या फक्त आरोप करुन थांबले नाहीत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अनधिकृत स्टुडिओ बांधण्याच्या परवानगीकरिता अस्लम शेख यांनी मंत्री असताना परवानगी दिली, ज्यामध्ये १००० हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय, असा सनसनाटी आरोप केलाय.
मुंबईचे तत्कालिन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मड मार्वेमध्ये अनधिकृत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या पत्रात आदित्य ठाकरे यांचंही नाव असल्याचं समजतंय. मड मार्वेमधील स्टुडिओच्या बांधकामाकरिता नागरिकांच्या शेकडो तक्रारी आल्या होत्या. मात्र तरीही सरकारने स्टुडिओच्या बांधकामाकरिता परवानगी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईच्या मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील १००० हजार कोटींचा अनधिकृत स्टुडिओचा बांधकामाला महाविकास आघाडी सरकारने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यता दिली होती. महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री यांना त्यावेळेला तक्रारी आल्या होत्या, त्यांनी ह्या भागाची पाहणीही केली होती, असं ट्विट करुन अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांची याप्रकरणी चौकशी केली जावी, अशा आशयाचं पत्र किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.
दुसरीकडे ३१ जुलै रोजी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मोहित कंबोज हे अस्लम शेख यांना घेऊन सागर निवासस्थानी गेले होते. त्याच्या आधी किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर अस्लम शेख यांनी फडणवीसांची भेट घेऊन तासभर बंद दाराआड चर्चा केली.

Leave a Reply