आ. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर राज्य सरकारचे सर्व आमदारांच्या वाहनचालकांसाठी नवे आदेश

मुंबई : २२ ऑगस्ट – राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर विधानसभेत निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. तसेच, याप्रकरणी पूर्ण कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही दिले. तसेच, सरकारने यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्व आमदारांच्या वाहनचालकांसाठी नवे आदेश काढले आहेत.
त्यानुसार आता सर्व आमदारांच्या वाहनचालकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यायची खबरदारी आणि रस्ते नियम यासाठी परिवहन विभागाकडून प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, सर्व आमदारांनी आपापल्या वाहनचालकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला, त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला.
हे प्रशिक्षण २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणार आहे. सर्व आमदारांनी त्यांच्या वाहनचालकांना या प्रशिक्षणासाठी पाठवावे अशी सूचना अध्यक्षांनी दिली.
आज विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघातावर निवेदन करण्यात आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी याविषयी निवेदन मांडले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटेंच्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
फडणवीस यावेळी म्हणाले, सध्या आपली यंत्रणा बदलण्याची गरज आहे, ११२ ला कॉल गेल्यानंतर त्याचं थेट लोकेशन गेलं पाहिजे, समोरच्याने पत्ता चुकीचा सांगितला तरी लोकेशन जर गेलं असतं, तर पोलीस वेळेवर पोहोचू शकले असते. त्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे. डिजीटल लोकेशनच्या आधारे पोलीस स्टेशनला माहिती मिळाली पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे. मोठे ट्रेलर जे लेन सोडून चालतात त्यांच्यावर नियंत्रण नाही, यासंबंधी लवकरच एक आयटीएमएस सिस्टीम संपूर्ण मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर तयार करणार आहोत. एआयचा वापर करुन ट्रॅकिंग करु शकू, जेणेकरुन अशा प्रकारच्या लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळू शकेल.
तर, अजित पवारांनी यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे हा ६ लेनचा आहे, तो ८ लेनचा करावा अशी मागणी केली. त्यावर सरकार सकारात्मक असून लवकरच निर्णय घेणार असं फडणवीसांनी सांगितलं. तसेच, सर्व आमदारांनी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, असा सल्लाही दिला.

Leave a Reply