बकुळीची फुलं : भाग ४४ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

घरात आता हिलमन गाडी महालक्ष्मी सारखी सोन्याची पावलं , मोत्यांची पावलं टाकत आली . सकाळी मुलांना दुध मिळू लागलं , येणारे जाणारे नेहमीप्रमाणे येतच होते पण आता मधून मधून घरात पोहे होत होते .महाराज बागेची ट्रीप होऊ लागली. त्या गाडी मालकाचे पैसे पूर्ण देऊन झाले. एकूण बराच बरा काळ आला होता.
त्यात मला मिळालेली “नागपूर पत्रिकेची” पार्ट टाईम नोकरी . मिळत होते तीनशे रूपयेच . पण आत्ता कुठे माझ्या जीवनात उजाडलं होतं .
समाजातल्या कामगार स्त्रिया, परिचारिका, सेल्स गर्ल्स, , सामाजिक कार्यकर्त्या, धुणी भांडी करणा-या, घरोघरी जाऊन पोळ्या करणा-या, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रिया. लेखिका, प्राध्यापिका ,
यांच्या समस्या मला दिसू लागल्या . तीन मुलांची आई झाले तरी काही कळत नव्हतंच. पण आता दिसू लागलं.
महिन्यातून एकदाच मी जिचकार सरांना चार आठवड्याचे विषय दाखवायची . तेच बोलायचे . नवनविन क्षेत्र सांगायचे त्यात स्त्रीची पत्रकारिता हा पण विषय आला. आणि माझ्यासाठी अनुभवाचं दार उघडलं .
मी काय लिहिते कसं लिहीते हा मला तेव्हाच नव्हे आजही कायम प्रश्न आहे . अगदी ७७ पुस्तकं प्रकाशित झाली तरीही.
माझा कायम वाचकांवर दृढ विश्वास आहे. कथा, कादंबरी जनमानसात रूजली , आवडली की मला अतिशय आनंद होतो. चार समीक्षकांनी माझं साहित्य वाचून अभिप्राय द्यावा असंही मनात आलं नाही.
“नागपूर पत्रिका ” मधले लेख सर्वांना आवडत होते . मी नोकरीला लागल्यावर दीडच वर्षांनी “नागपूर पत्रिका” पेपरच बंद झाला . मनापासून वाईट वाटलं .
पण “तरूण भारत” मधे बालकथा प्रसिद्ध होती होत्या .
नोकरी संपली आणि पंधराच दिवसांत मला “दै. तरूण भारत” चं पत्र आलं . रविवार पुरवणीतला बालविभागाचं एक पान संपादन कराल का ?
आणि हे पत्र आलं ज्येष्ठ पत्रकार , रविवार पुरवणीचे संपादक श्री वामन तेलंग यांचं .
त्यांनी लिहीलं होतं
” तुमचा होकार असेल तर संपादकांना सांगतो, तुमच्या बालकथा सर्वांना आवडतात. तुम्हाला महिला विभाग आवडतं असेलही पण मालतीबाई निमखेडकर तो विभाग सांभाळताहेत . “
अर्थात ही संधी स्वतः हून चालत आलेली होती . नाही म्हणावं हा विचार तरी कसा येईल . फक्त हे म्हणाले
” घर , मुलं , त्यांचा अभ्यास सारं होत असेल तर अवश्य जा . . तुला चांगली संधी मिळावी ह्याहून मला अधिक काय हवं ?”
त्यावेळी मामासाहेब घुमरेच संपादक होते.
जे मला पुसद साहित्य संमेलनात भेटले होते. मला खुप बरं वाटलं. कुणाशी अघळपघळ बोलावं ह्याचा मला त्यावेळी संकोच होता . त्यांनी प्रथम केबिनमध्ये बोलावलं .
” तू चांगल्या बालकथा लिहीत्येस आता तर या केवळ तपासायच्या , चित्रकाराला कथा कल्पना सांगायची , संपूर्ण एक पान मुलांचं आहे , कशी विविधता येईल अजून काय काय टाकून पान सजवता येईल ते पहावं . वामन तेलंग आहेत योग्य ते सांगायला “
मी तरूण भारत मधे येऊन १५ दिवस झाले पण माझं काम वामन तेलंग बघत होते . अखेर त्यांना विचारलं . तर मोजक्याच शब्दात ते म्हणाले
” प्रथम पाहून पाहून शिका . आपोआप येईल “
“पण मला संधी द्याल तेव्हाच ना”
“ठीक आहे, पुढे तुम्ही बघा”
मी माझं लेआऊट स्वतः तयार केलं ,त्यात
बाल कादंबरी क्रमशः ,बालकांनी काढलेली चित्रं, कविता , असं अनेक नव्या कल्पना
घेऊन नवं पेज तयार केलं.
ते मी वामन तेलंग ह्यांच्या हाती दिलं .खरंतर दोन शब्द ते बोलले पण मला आनंद झाला नाही. ते म्हणाले ” ठीक”
त्याचं वेळी जीवनाला पुढचा मार्ग दिसावा अशी घटना घडली , ज्याची मी कधीही कल्पनाही केली नव्हती.
“सासर माहेर” ह्या दिवाळी अंकात माझी एक कथा प्रकाशित झाली होती .त्या दिवाळी अंकातल्या पहिल्या कथेचं मानधन मला दीडशे रुपये मिळालं . तेव्हा समजलं कथेलाही मानधन मिळतं.
” लघुकथाच लिहाव्या,आता बालविभाग आहे तेवढं पुरेसं आहे . “
” असा मनात विचार येतो ना येतो तोच आठच दिवसांनी गुलमोहोर
प्रकाशनचं पत्र आलं .
ही जी कथा लिहीलीत
त्यावर एक कादंबरीच लिहावी आणि तुम्ही ती लिहू शकाल”
आयुष्यात कथाही मी चांगल्या लिहीते यावर माझा विश्वास नव्हता. कादंबरीचा विचारही दूर दूर पर्यंत मनात नव्हता . आई म्हणाली
“प्रयत्न करायला काय हरकत आहे.”
हे म्हणाले, ” न जमायला काय झालं , सहज जमेल . “
जी सासर माहेर या दिवाळी अंकात जी आठ , दहा पानांची कथा लिहीली होती,तीच आईने मी दहावीचा अभ्यास करतांना लिहीली होती. ती मी माझ्या
भाषेत फेअर करून पाठवली होती पण कादंबरी , शंभर पानं तरी हवीच . कथेचं तंत्र मंत्र मला माहित नव्हतंच , लिहीली खरी. पण आता दहा पानांची शंभर पानं कसं शक्य होतं ?
मला जमणार नव्हतंच .
मी शेजारच्या पोस्ट ऑफिस मधून पोस्टकार्ड आणलं . आणि माझ्या सुवाच्य अक्षरात ,
प्रामाणिकपणे , “मला लिहीता येणार नाही , क्षमस्व” . लिहीलंआणि खाली झोकात माझी डौलदार सही केली पत्ता लिहीला . आणि सुनीलला पोस्टाच्या पेटीत पत्र टाकायला सांगितलं.
मी निश्चिंत . आठ दिवसांनी त्याच्या मराठीच्या पुस्तकातून ते पोस्ट कार्ड खाली पडलं , दफ्तर
भरतांना .
“हे” तिथेच होते त्यांनी ते उचललं. म्हणाले
, तुझ्या तीन मुलांना पहिलं पाऊल टाकायला शिकवलंस , त्यांना जड जात होतं पाऊल टाकतांना तेव्हा तू सावरलंस. आता का घाबरतेस , नविन पाऊल टाकायला ? तू लिहीलंस आणि परत आलं तर काय होईल ? नुकसान तर काहीं नाही. ? लिहून तर पहा . ! “
आणि एका गुरूवारी सकाळी मी “लिहायचीच कादंबरी” असं ठरवून एक पान लिहिलं.

आणि आता पुढे…..

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply