अमरावतीत जिल्हा परिषदेच्या शाळेत मद्यधुंद शिक्षकाचा धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल

अमरावती : २० ऑगस्ट – मद्य प्राशन करून शाळेत आलेल्या एका सहायक शिक्षकाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून वर्गातच झोप काढल्याचा धक्कादायक प्रकार धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उघडकीस आला. या शिक्षकाने वर्गातच लघूशंका केली. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगताच काही पालक शाळेत धडकले आणि त्यांनी या मद्यधुंद शिक्षकाला जाब विचारला. या प्रकाराची तक्रार पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दुसरीकडे, या शिक्षकाची चित्रफित सार्वजनिक झाली आहे.
पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण (३८) असे या सहायक शिक्षकाचे नाव आहे. काकरमल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत एकूण चार शिक्षक कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी हा सहायक शिक्षक शाळेत मद्यधुंद अवस्थेत आला आणि विद्यार्थ्यांलना सुटी झाल्याचे सांगून घरी पाठवून दिले. या शिक्षकाने नंतर एका वर्गखोलीत जाऊन बाकावर पाय ठेवले अन् चक्क झोप घेतली. यावेळी त्याने वर्गखोलीतच लघूशंका देखील केल्याचे समोर आले.
विद्यार्थ्यांनी घरी पोहचून शाळेला सुटी झाल्याचे सांगितले, तेव्हा काही पालक शाळेत पोहचले. त्यांना हा सहायक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत दिसला. काही पालकांनी त्याला जाब विचारला, तेव्हा शिक्षकाने त्यांच्यासोबत बाचाबाची केली. उपसरपंच अशोक कासदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर यांच्यासह पालकांनी केंद्र प्रमुखांना या घटनेची माहिती दिली. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

Leave a Reply