मी मंत्र्यांशी बोलतो आहे, तुमच्याशी नाही – भास्कर जाधव यांनी निलेश राणेंना फटकारले

मुंबई : १८ ऑगस्ट – भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावलं. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली. मात्र एवढं करुनही नितेश राणे शांत व्हायला तयार नाहीत हे पाहून भास्कर जाधव चांगलेच संतापले. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा. त्यानंतर दोघेही शांत झाले.
आज सकाळपासूनच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आक्रमक अंदाजात दिसत होते. अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाम सुरु होऊन जेमतेम २० मिनिटे झाली होती, तोच लक्षवेधीवरुन भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. माझ्या लक्षवेधीची मला उत्तरं मिळणार कधी, मला ती उत्तरं वाचून त्यावर प्रश्न विचारायचे आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. त्यावर फडणवीसांनी मिश्किलपणे, “भास्करांना वाचायची गरज काय, पाहिलं तरी तुम्हाला लगेच कळतं…”, असं म्हणत गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर लक्षवेधी मांडली होती. त्यावर राज्य शासनाच्या वतीने मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच तातडीच्या उपाययोजनांसाठी कोकणातील सर्व आमदारांसहित या रस्त्याची पाहणी करून त्यावर उपाययोजना केली जाईल, असं उत्तर दिलं. या चर्चेत कोकणातील आमदार म्हणून भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला. मी या विषयावर सतत प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही थकलो… मात्र शासनाचे अधिकारी तीच तीच उत्तरे देताना थकत नाहीत. त्याला बारा वर्षे झाली… अशी नाराजी भास्कर जाधवांनी व्यक्त केली.
यावेळी भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी, “त्यात मधली अडीच वर्षे वाया गेली” असा शेरा मारुन महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं. त्यावर जाधव यांनी मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको. मी मंत्र्यांशी बोलतो आहे, तुमच्याशी नाही, अशा शब्दात नितेश राणे यांना फटकारलं. त्यावर राणे पुन्हा पुन्हा शेरे मारतच होते. तेव्हा मात्र भास्कर जाधव यांनी त्यांना चांगलेच खडसावले. त्यामुळे सभापती राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा लागला.

Leave a Reply