मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

काय करू काही सुचत नाही

काय लिहू कळत नाही आज मन का बरे उदास वाटत आहे. अस कधी होत नव्हतं. ह्रदयाच्या मनाच्या कप्प्यात एक आवाज ऐकू आला. आज काय झाले तुला तुझ्या भरपूर आठवणी माझ्या कप्प्यात तू साठऊन ठेवले ना. मग विचार कर उचल लेखणी आणि सुरुवात कर. तो आवाज आला आणि केली सुरुवात लिहायला…..
थेंब थेंब जागं झालं, रेष रेष बोलती झाली. ह्रदयाच्या कोपऱ्यातल्या एक बालपणीचा कोपरा अचानक हळवा होतो.
एखाद्या संगणकातील डाटा save करतो त्याप्रमाणे आपणही अनेकदा या हळव्या कप्प्यात सेव्ह केलेला बालपणीच्या आठवणींचा डाटा अनुभवत पुन्हा लहानपणात रमून जातो.
कुणा एखाद्याच्याच बाबतीतच असं घडतं, असं नाही. असं
घडण्याला वयाचं बंधन नसतं. बालपण सरून तारुण्यात पदार्पण केलेल्या, तारुण्यातून वार्धक्याच्या उंबरठय़ावर पाऊल टाकलेल्या किंवा त्याही पुढचा वयाचा टप्पा गाठलेल्या प्रत्येकाच्या मेंदूतला हा, लहानपणीच्या आठवणींचा कप्पा प्रत्येकानंच जिवापाड जपलेला असतो.. तो आपल्या उभ्या आयुष्याची जणू शिदोरीच असतो……
एखाद्या वेळी, आसपासच्या गर्दीतही, आपण आपले एकटेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, तेव्हा हा कप्पा अगदी हमखास उघडतो. गर्दीतूनच, या कप्प्यावर क्लिक करणारं काहीतरी घडून जातं. शेजारीच बसलेल्या कुणाला खूप दिवसांनंतर बालपणीचा कुणीतरी अचानक भेटतो आणि ते दोघं लहानपणीच्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर झोके घेऊ लागतात. हो, हे असच असत.
दुसरा दिवस उजाडतो, काल आठवलेल्या गोष्टींची आपण उजळणी करतो आणि आपल्या मेंदूत बालपणी घडलेल्या गोष्टी आठवून आपल्या चेहऱ्यावर हळूच एक smile येत आणि आपण त्या आठवणीत हळुवार हिंदोळे घेत सुटतो.
आपल्या आयुष्यात असाच होत. आपली आई,बाबा, आजी आजोबा, यांच्यासोबत रमलेले दिवस कधी कधी आपल्या स्वप्नात येतात आणि ते सगळे आपल्याला जिवंत दिसतात. त्याच आठवणींनी आपलं मन त्यात रमून जात आणि अचानक सकाळी पक्षाच्या किलबिलाटाने आपण जागे होतो तो नवीन दिवसाची सुरुवात करण्यासाठी.

पल्लवी उधोजी

Leave a Reply