मद्यधुंद तरुणांची पोलिसांनाच धक्काबुक्की, कारने दिली पोलिसांच्या दुचाकीला धडक

नागपूर : १८ ऑगस्ट – शहरातील फुटाळा तलाव येथे मद्यधुंद अवस्थेत दारू पिणाऱ्यांना पोलिसांनी हटकले असता आरोपींनी पोलिसालाच धक्काबुक्की केली. एकाने कार भरधाव वेगाने चालवत पोलिसाच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्घ गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलिस ठाणे हद्दीतील फुटाळा फाऊंटेन, गेट क्रमांक ४, समोरील सार्वजनिक रोडवर अंबाझरीचे पोहवा शिवपाल दरियावसिंग यादव हे सीआर मोबाईलने स्टाफसह पेट्रोलिंग करीत होते. यावेळी, रोडवर पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट डिझायर (क्रमांक एमएच ३१ एफई ८५२३) ही उभी करून तीन इसम गाडीमध्ये दारू पिताना दिसून आले. परिणामी, पोलिसांनी त्यांना हटकले. या कारणावरून गाडीतील आरोपी मोहित रघुनाथ तिवारी (वय ३0), रोहित रघुनाथ तिवारी (वय ३२, दोघे रा. गोरेवाडा), दीपक राजूप्रसाद शुक्ला (वय ३0, रा. प्लॉट नंबर १00, निर्मलनगर गोरेवाडा) यांनी संगनमत करून धूमधाम करून पोलिस हवालदाराला धक्काबुक्की केली व एकाने त्यांच्या हाताच्या मनगटाला पिरगळले. आरोपी दीपक शुल्का याने दारूच्या नशेत स्विफ्ट कार ही धोकादायक रितीने भरधाव चालवून पोलिस वाहन (क्रमांक एमएच ३१ डी. झेड. 0३८२) ला समोरून धडक मारली. आरोपींचा धिंगाणा बघता पोलिसांनी त्यांना ठाण्यात आणले. येथेही त्यांनी दारूच्या नशेत आरडाओरड करून असभ्य वर्तन केले. त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असता आरोपी हे मद्यार्काच्या अंमलाखाली असल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला. या प्रकरणी पोलिस शिपाई यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३५३, २७९, १८६, ३३६, ४२७, ५0६, ३४ भादंवि सहकलम १८४, १८५ मोवाका सहकलम ८५ मदाका अन्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.

Leave a Reply