पुराच्या पाण्यात स्मशानभूमीसह प्रेतही गेले वाहून!

नंदुरबार : १८ ऑगस्ट – मागच्या चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान नवापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. पावसामुळे वाघसेपा गावातील नदीकिनारी असलेली स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे उत्तर कार्य बाकी असताना प्रेत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. स्मशानभूमी वाहून नुकसान झाल्याच्या सगळ्या प्रकाराला साठवण बंधारा बांधणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे झाले असल्याचा आरोप वाघसेपा येथील गावकऱ्यांनी केला आहे.
साठवण बंधारा बांधत असतानाच गावकऱ्यांनी सदर ठेकेदाराला बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलावी, तसेच स्मशानभूमीच्या बाजूने भराव टाकून संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी केली होती. परंतु सदर ठेकेदाराने माती टाकून थातूरमातूर काम केल्याने वाघसेपा ग्रामस्थांची वडिलोपार्जित स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून अस्तित्व नष्ट झाल्याने सदर ठेकेदारावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन वाघसेपा गावातील स्मशानभूमीत पुरामुळे नदीचे स्वरूप आल्याच्या ठिकाणी तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे. अशी मागणी वाघसेपा गावाचे रोजगार सेवक विजय पाडवी, पोलीस पाटील विश्वास पाडवी, अविनाश गावित, दारासिंग पाडवी, कृष्णाजी पाडवी, जितेश पाडवी, दीपक पाडवी आदी ग्रामस्थांनी नदीकिनारी नुकसान झालेल्या स्मशानभूमीची पाहणी करून तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply