आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का? – बच्चू कडू यांचा विरोधकांना सवाल

मुंबई : १८ ऑगस्ट – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांच्या घोषणांनी चांगलाच गाजला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून ही घोषणाबाजी केली. “गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके” अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोकी मिळ्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपावर आमदार बच्चू कडूंनी प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?” असा सवाल बच्चू कडूंनी विरोधकांना केला आहे. “तुम्हाला जर प्रत्येक आमदाराला किती खोकी दिली याबाबत माहिती होती तर त तुम्ही अडवायचं होत. आम्हाला थांबवायचं होतं. विरोधक अशा प्रकारचे आरोप करतच असतात त्याला काहीही अर्थ नसतो”, असे वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे.
सध्या फोन टॅपिंगचे प्रकरणही चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फोन टॅपिंगचे प्रकरणात आता बच्चू कडू यांचे नाव आले आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत बच्चू कडू यांचाही फोन टॅप झाला होता, अशी माहिती शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
“माझा फोन टॅप करण्यात आला होता. मात्र, हे सगळ चूकीचं आहे. नेत्याचा फोन टॅप करणं हा नालायकपणा आहे. दरम्यान, या प्रकरणात मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. अशी वेळ या बच्चू कडूवर येणार नाही. काही केले असेल तर सिद्ध करावे. त्यासाठी कोणाच्या पाया पडायची गरज नाही”, असं म्हणत बच्चू कडूंनी आपला बचाव केला आहे.

Leave a Reply