‘घराघरात वंदे मातरम्’ मुनगंटीवार आगे बढो…- विनोद देशमुख

भारताचे स्वातंत्र्य अमृतकाळात (म्हणजे 76 ते शंभर वर्षे हे पाव शतक) प्रवेश करीत असताना महाराष्ट्राचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या एका निर्णयाने आपल्या सर्वांचा ऊर भरून यावा. फोन किंवा मोबाईलवर पहिला प्रतिसाद देताना ‘हॅलो’ म्हणण्याऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे, असे त्यांनी सुचविले आहे. प्रारंभी राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश काढण्यात येणार आहे. तथापि, सर्वांनीच ही प्रथा सुरू करावी, अशी मुनगंटीवारांची अपेक्षा असणारच. त्याला आपण सर्व देशप्रेमी नागरिकांनी सहर्ष साथ दिली पाहिजे आणि मोदीजींच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेप्रमाणेच ‘घर घर वंदे मातरम्’ अशी लोकचळवळ उभी केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची ही एक मोठी उपलब्धी ठरेल आणि ‘हॅलो’ हे इंग्रजाळलेले प्रतीक कायमचे हद्दपार होण्यास मदत होईल.
ही अफलातून कल्पना काढणारे मुनगंटीवार यांचे अभिनंदन करण्यापेक्षा त्यांचे आभार मानणेच जास्त योग्य राहील. कारण, वंदे मातरम् हे साधे दोन शब्द नाहीत. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला स्फूर्ती देणारा तो मंत्र आहे. या ऐतिहासिक वारशाची जपणूक करून त्याला पुनर्प्रतिष्ठापित करण्याचे फार मोठे काम मुनगंटीवार यांनी हाती घेतले आहे. त्याला यश मिळण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागणे गरजेचे आहे. तेव्हा चला, आजपासून ‘हॅलो’ च्या जागी ‘वंदे मातरम्’ ने संभाषण सुरू करू या !
मुळात हॅलो हा शब्द आज जगभर वापरात असला तरी तो या कामासाठी मुद्दाम तयार केला गेलेला नाही. टेलिफोनचे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी चाचणी घेण्यासाठी पहिला काॅल केला, तो आपल्या मैत्रिणीला आणि तिचे नाव होते हॅलो ! त्यामुळे बेलने स्वाभाविकपणेच पहिला शब्द उच्चारला- हॅलो ! तोच प्रचलित झाला आणि गेली दीडशे वर्षे जगभरातील कोट्यवधी लोक त्याचा नित्य वापर करीत आहे. ही पृष्ठभूमी लक्षात घेतली तर, हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणणे केव्हाही चांगलेच. शिवाय त्यातून देशभक्ती बिंबवण्यास मदतही होणार आहे. इतका दूरगामी परिणाम साधू शकणारा उपक्रम हाती घेणारे मुनगंटीवार किती अनोखे आणि कल्पक नेते आहेत, याची साक्ष पटावी.
नवीन खातेवाटपात मुनगंटीवारांना वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय ही तीन खाती मिळाली आहेत. 2014 ते 2019 याकाळात ते अर्थमंत्री, वनमंत्री होते. मात्र, यावेळी अर्थ खाते उपमुख्यमत्री देवेन्द्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. यावरून अनेकांनी अकलेचे तारे तोडले की, मुनगंटीवारांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आली. वास्तविक सर्व खाती सारखीच असतात अन् सर्व मंत्रीही समान दर्जाचे असतात. कार्यकुशल आणि तडफदार नेता कोणत्याही खात्याचा मंत्री झाला तरी तेथे आपली छाप पाडतो आणि स्वकर्तृत्वाने त्या खात्याचे नाव उज्ज्वल करीत असतो.‌ (उदाहरण- माजी ग्रामीण विकास मंत्री स्व. आर. आर. आबा पाटील) त्यामुळे, अर्थमंत्री म्हणून गाजलेले उच्चविद्याविभूषित सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक कार्य खात्याचा चेहरामोहरा बदलवून दाखवतील, याविषयी शंकाच नाही आणि याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयातून दिसत आहे. म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देताना म्हटले पाहिजे- “सुधीरभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है” ! वंदे मातरम्
या चांगल्या उपक्रमाला विरोध दर्शवून रझा अकादमीने आपले खायचे दात पुन्हा दाखविले आहेत. या प्रवृत्तीचा सर्वांनी निषेधही केला पाहिजे.

विनोद देशमुख

Leave a Reply