एक चांगला सहकारी आम्ही सगळ्यांनी गमावला – अजित पवार

मुंबई : १४ ऑगस्ट – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विनायक मेटेंच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये विनायक मेटेंच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. मात्र, त्याचबरोबर या अपघातावर संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप होत असतानाच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अपघातासाठी त्यांच्या कारचालकाची डुलकी कारणीभूत ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आजची पहाट सगळ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय काळी पहाट झाली. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. माझे एक अतिशय जवळचे सहकारी असलेले विनायक मेटे आपल्यातून निघून गेले आहेत. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका सतत ते मांडत होते. ते कुठेही असले, तरी अनेक वर्ष माझे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. चार दिवसांपूर्वी सकाळी ८ वाजता त्यांनी देवगिरी बंगल्यावर माझी भेट घेतली. मला १५ सप्टेंबरला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलं होतं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा सोडला नाही. विनायक मेटेंनी मराठा समाजासाठी शिवसंग्राम संघटना स्थापन केली. ते पूर्वी आमच्यासोबत राष्ट्रवादीतही होते. आम्ही एकोप्यानं चर्चा करायचो. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक दौऱ्यांमध्ये सोबत होतो. एक चांगला सहकारी आम्ही सगळ्यांनी गमावला आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीसाठी ते येत होते. माझं मत आहे की रात्रभर प्रवास करून येत असताना चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे सगळं घडलं. आम्ही सगळे राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी रात्रभर प्रवास करणं हे नेहमी टाळलं पाहिजे. पण वेळ महत्त्वाची असते, त्यामुळे अनेकदा ते टाळणं शक्य होत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply