जर दोषी नसतील तर मंत्रीपद का देऊ नये – दीपक केसरकरांनी केली संजय राठोड यांची पाठराखण

पुणे : १२ ऑगस्ट – कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही. एका समाजाचा मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री यांनी पाळले, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. ते पुण्यात बोलत होते. वादग्रस्त संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून सध्या वादंग सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल. तसेच ही चौकशी निःपक्षपातीपणे होईल. परंतु जर दोषी नसतील तर मंत्रीपद का देऊ नये, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलणे टाळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
संजय राठोड दोषी आढळले असते तर कारवाई झाली असती. बंजारा समाजाच्या भावना होत्या. त्यामुळेच संजय राठोड यांना मंत्रीपद दिले, असे केसरकर म्हणाले. संजय राठोड यांच्याविषयी मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही केले गेले. विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. तर मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीही नाराज नाही. आधी म्हणत होते, गेलेले परत येतील, मात्र आमचे संख्याबळ वाढतच आहे. अनेकांची नाराजी होती. ती बाहेर आली. उठाव करायला धैर्य लागते. नाहीतर सर्वच्या सर्वच आले असते. मात्र तसे झाले नाही, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.
मेट्रो प्रकल्पामध्ये 10 हजार कोटींची वाढ झाली आहे. हा बोजा जनतेवर पडत असतो. असे प्रकल्प थांबवून ठेवले तर किंमतीमध्ये वाढ होते. आरे मेट्रोमुळे प्रदुषण वाढणार नसून कमी होणार असल्याचा दावादेखील यावेळी केसरकर यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतची परवानगी दिली होती. पर्यावरण रक्षण झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काम केले जात आहे.
मी उद्धवसाहेब यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही नि काही बोललो तर टायटल होते, मी उद्धवसाहेब यांच्यावर टीका केली. मला ते नको आहे, म्हणून मी त्यांच्याबाबत बोलणे टाळतो, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply