पुराने वेढलेल्या गावात मुलीच्या उपचारासाठी मे बापाने केला ४ किमीचा जीवघेणा प्रवास

चंद्रपूर : ११ ऑगस्ट – गावाला पुराने वेढा दिला होता. अशात दीड वर्षाची मुलगी तापाने फणफणत होती. उपचारासाठी इतर गावाला जाण्यासाठी मार्ग नव्हता. होती ती केवळ घनदाट जंगलाची वाट. मुलीला खांद्यावर उचलून तब्बल चार किमीची जंगलाची वाट माय-बापाने पायी तुडविली. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी येथील या प्रकाराने पूरस्थितीची भयावहता प्रखरतेने समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पाऊस बरसला. या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. पुरामुळे पाणी आल्याने अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी गावाला पुराने वेढा दिला आहे. अशात गावातील नथ्थू वागदरकर यांची दीड वर्षाची मुलगी लावण्या ही दोन दिवसांपासून तापाने फणफणत होती. मुलीची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र पुराने वेढा दिला असल्याने उपचारासाठी न्यायचे कसे? हा मोठा प्रश्न आई-वडिलांना पडला होता.
अखेर त्यांनी मुलीला उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना जंगलातून जावं लागणार होतं. त्यांनी मुलीसाठी हा धाडसी निर्णय घेतला. आपल्या दीड वर्षाच्या लावण्याला खांद्यावर घेत आई-वडिलांनी कन्हारगाव अभयरण्यातील घनदाट जंगलातून चार किलोमीटर अंतर पायी पूर्ण केले. या घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली होती. कोठारी पोलीस रूग्णवाहिका घेऊन तातडीने मदतीला पोहचलेले. अखेर आता मुलीला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

Leave a Reply