तर आपल्याला दूध-दह्यावर जीएसटी लावायची गरज पडली नसती – अरविंद केजरीवालांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट – जनतेसाठी मोफत सुविधांच्या घोषणा सर्वच राजकारण्यांकडून कमी-अधिक प्रमाणात केल्या जातात. काही ठिकाणी याचा अतिरेक देखील झाल्याचं अनेकदा दिसून येतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात केलेल्या विधानानंतर या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून राज्यात प्रचार करताना मोफत सुविधांची आश्वासनं दिली जात आहेत. यासंदर्भात पंतप्रधानांनी आक्षेप घेणारं विधान केल्यानंतर त्यावर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ जारी करत प्रत्युत्तर दिलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. “असं म्हटलं गेलं की जनतेला मोफत सुविधा दिल्या गेल्या तर त्यातून देशाचं नुकसान होईल, करदात्यांची फसवणूक होईल. मला वाटतं की करदात्यांची फसवणूक तेव्हा होते जेव्हा त्यांच्याकडून कर घेऊन राजकारणी आपल्या काही मित्रांची कर्ज माफ करतात. मग करदाते विचार करतात की पैसे तर माझ्याकडून घेतले होते. हे सांगितलं होतं की तुमच्यासाठी सुविधा देऊ. पण माझ्या पैशातून आपल्या मित्रांची कर्ज माफ केली जात आहेत”, असं केजरीवाल या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
“देशभरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर जीएसटी लावला आणि आपल्या मोठमोठ्या श्रीमंत मित्रांना करमाफी दिली, त्यांना करामध्ये सवलत दिली. आम्ही जनतेच्या मुलांना चांगलं आणि मोफत शिक्षण देतो, लोकांवर मोफत उपचार करतो यामुळे करदात्यांची फसवणूक होत नाही. पण सत्ताधाऱ्यांच्या श्रीमंत मित्रांची कर्ज माफ केल्यामुळे करदात्यांची फसवणूक होते. जर १० लाख कोटींची कर्ज माफ केली गेली नसती, तर आपल्याला दूध-दह्यावर जीएसटी लावायची गरज पडली नसती”, असं सुद्धा केजरीवाल या व्हिडीओत म्हणाले आहेत.
“माझी मागणी आहे की यावर सार्वमत घेतलं जावं. जनतेचा पैसा एका परिवारासाठी वापरला जायला हवा का? दुसरा प्रश्न आहे की जनतेचा पैसा काही मोजक्या श्रीमंत मित्रांसाठी वापरला जायला हवा का? आणि तिसरा प्रश्न हवा की जनतेचा पैसा सामान्य लोकांना सुविधा देण्यासाठी वापरला जायला हवा का? जनतेला मोफत सुविधा दिल्यामुळे देशाचं नुकसान होत आहे असं एक वातावरण तयार केलं जात आहे”, असं केजरीवाल यांनी नमूद केलं.

Leave a Reply