मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही म्हणणाऱ्यांना पॉलिटिकल अल्झायमर झाला आहे – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : १० ऑगस्ट – एकनाथ शिंदे सरकारचा महिनाभरापेक्षा अधिक काळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी झाला. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदार अर्थात एकूण 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मात्र या विस्तारात एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका केलीय. त्या टीकेला आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय. मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही म्हणणाऱ्यांना पॉलिटिकल अल्झायमर झालाय, असा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावलाय.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुनगंटीवार मंगळवारी रात्री नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विदर्भातील विकासाचा बॅकलॉग फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण संपवून टाकणार. विदर्भाचा विकास करणार, उच्च दर्जाचं शिक्षण विदर्भात प्राप्त व्हावं याचं नियोजन केलंय. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. खात्याचा निर्णय आमचे दिल्लीतील वरिष्ठ ठरवतात, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
तसंच कोळसा चोरी होत असेल असं प्रकरण बाहेर आलं तर त्याची सीबीआय चौकशी होईल. चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा चेरीबाबत सीबीआय कारवाई करणार, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच राज्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत देण्यास सुरुवात झालीय. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जास्तीची मदत देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

Leave a Reply