भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो – शरद पवार

मुंबई : १० ऑगस्ट – देशात महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचं उदाहरणही दिलं आणि अकाली दलाला भाजपाने संपवल्याचा आरोप केला.
शरद पवार म्हणाले, “प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.”
भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.
शरद पवार यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात आणि वेगळं चिन्ह ठरवू शकतात. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांपासून स्वीकारलेलं हे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं आणि त्यातून वाद-विवाद निर्माण करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर, ते जरूर स्वत:चा पक्ष काढू शकतात आणि स्वत: वेगळं चिन्ह ठरवू शकतात.”
“माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले होते. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह ‘घड्याळ’ घेतलं. आम्ही त्यांचं चिन्ह मागितलं नाही किंवा वाद वाढवला नाही. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत” असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Leave a Reply