भाजपचे इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे हे त्यांचं शुद्धीकरण करण्याचा प्रकार – पी चिदंबरम

नवी दिल्ली : १० ऑगस्ट – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून जनता दल (संयुक्त) आणि भाजपाची युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर मंगळवारी अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी यावरुन भाजपाला लक्ष्य केलं असून टोला लगावला आहे.
पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून बिहारमधील राजकीय स्थितीवर भाष्य केलं असून भाजपावर उपहासात्मक टीका केली आहे. भाजपा जेव्हा इतर पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी असतं असा टोला त्यांनी लगावला आहे.
“भाजपा कधीही कोणत्याही राज्यातील लोकांचा विश्वासघात करत नाही. पक्षांतरांसाठी प्रोत्साहन देणं हा पक्षांतर करणाऱ्यांच्या विकासाठी कल्याणकारी उपाय आहे. इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे हे त्यांचं शुद्धीकरण करण्याचा प्रकार आहे. राज्य सरकारांना अस्थिर करणं, त्या राज्यांमध्ये स्थिरता आणण्यासाठी आहे,” असं उपाहासात्मक ट्विट पी चिदंबरम यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले “विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात कारवाई कऱणं हा संसदेने संमत केलेल्या कायद्यांच्या परिणामकारकतेची चाचणी करण्याचा भाग आहे, जेणेकरुन कायदे अजून कडक करता येतील”.
“काँग्रेसमुक्त भारत म्हणजे चीन, रशिया, तुर्कस्तान, व्हिएतनाम आणि उत्तर कोरिया यांसारख्या एकपक्षीय शासनाच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्याचं उद्दिष्ट आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
जातनिहाय जनगणना, लोकसंख्या नियंत्रण, अग्निपथ योजना आदी मुद्यांवरून भाजप आणि ‘जदयू’ यांच्यात मतभेद होते. मात्र, ‘जदयू’चे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांना बळ देऊन भाजपा पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय नितीशकुमार यांना होता. त्यामुळे सावध झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेतल्याचे मानले जाते.
महाआघाडीकडे १६४ आमदारांचे बळ
बिहार विधानसभेची सदस्यसंख्या २४२ असून, १२२ हा बहुमताचा जादुई आकडा आहे. राजद- ७९, जदयू-४६, काँग्रेस-१९, डावे पक्ष-१६, हिंदूस्तानी आवाम मोर्चा-०४ असे महाआघाडीकडे १६४ आमदारांचे संख्याबळ आहे

Leave a Reply