आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत – नितीश कुमार यांचा भाजपवर प्रहार

पाटणा : १० ऑगस्ट – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीश कुमार यांनी भाजपवर प्रहार केला आहे. खासकरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर नितीश कुमार यांनी पलटवार केला आहे. काही लोकांना वाटतं विरोधी पक्ष संपुष्टात येईल. पण आता आम्हीही विरोधी पक्ष आहोत. 2014मध्ये आलेले 2024मध्ये राहतील तर ना? आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला आहे. तसेच विरोधी पक्षांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र यावं असं मी आवाहन करत आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान पदाचे आपण दावेदार नसल्याचंही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. नितीश कुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील. फक्त भाजप राहील. शिवसेनाही संपुष्टात येईल, असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सर्वच विरोधी आणि प्रादेशिक पक्षांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि उपेंद्र कुशवाहा यांनी भाजपवर पलटवार केला आहे. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनीही नड्डा यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आम्ही राहू, न राहू. पण 2024मध्ये ते सत्तेत राहणार नाहीत, असा इशाराच नितीश कुमार यांनी दिला आहे.
हिंदी पट्ट्यात भाजपची कुणासोबतही युती राहिलेली नाही. भाजपने नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना राजकारणातून नामशेष केल्याचा इतिहास आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात तेच घडलं. बिहारमध्येही तेच होणार होतं. हे आता लपून राहिलं नाही. लोकांना घाबरवणं आणि खरेदी करणं एवढंच भाजपला माहीत आहे. बिहारमध्ये भाजपचा अजेंडा लागू होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. लालूप्रसाद यादव यांनी तर लालकृष्ण अडवाणी यांचा रथ रोखला होता. आम्ही कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply