मंत्रिमंडळात कलंकितांना संधी मात्र महिलांना स्थान नाही – नाना पटोले यांची टीका

मुंबई : ९ ऑगस्ट – तब्बल 39 दिवसानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. या मंत्रिमंडळात आरोप असलेले अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. पण एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. त्यावरून नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारमध्ये कलंकीत सत्तार आणि राठोडांना संधी मिळते पण महिलांना स्थान मिळत नाही, अशी खोचक टीका पटोले यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. इतर सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येच भ्रष्ट मंत्र्यांना स्थान दिले जात आहे. यावरून भाजपचा (bjp) खरा चेहरा उघड झाल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. पटोले यांच्या या टीकेवर भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांना आघाडी सरकारमधून काढून टाकण्यात आले होते. राठोड यांना काढून टाकण्यासाठी भाजपानेच मागणी केली होती. आज त्याच संजय राठोड यांना भाजपाप्रणित सरकारमध्ये पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. टीईटी परिक्षेतील घोटाळ्याचा डाग आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर असताना त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देऊन या सरकारमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मानाचे स्थान दिले जात आहे. दुसऱ्या पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांमार्फत कारवाया करावयास लावायच्या व स्वतःच्या सरकारमध्ये मात्र भ्रष्ट लोकांना मंत्रिपद द्यायचे यातून भाजपाचा खरा चेहरा दिसून येतो. मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही यावरूनच भाजपाला महिलांबाबत किती आस्था आहे हे दिसून येते, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या सरकारकडे पैसे नाहीत. पण गुजरातच्या हिताचा व पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ड्रिम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी देण्यास पैसे आहेत. यावरूनच या सरकारची दिशा स्पष्ट दिसत असून ईडी सरकार हे राज्यासाठी हानिकारक असल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply