५ हजाराची लाच मागणारा महावितरणचा लिपिक अटकेत

नागपूर : ५ ऑगस्ट – नवीन मीटरला मंजुरी आणि तपासणीचा अहवाल देण्यासाठी व्यावसायिकाला 5 हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. नीलेश पुंडलिक वरगडे (36) असे अटकेतील लाचखोर आरोपीचे नाव आहे.
नीलेश एमएसईडीसीएलच्या नंदनवन विभागात कनिष्ठ लिपिक आहे. तक्रारकर्ते हे भिवापूरला रहात असून सोलर पॅनल फिटिंगचा व्यवसाय करतात. नंदनवन परिसरातील एका घरी त्यांनी सोलर पॅनल लावले होते. नवीन मीटर आणि मीटर तपासणीचा अहवालासाठी त्यांनी नंदनवन येथील महावितरण कार्यालयात अर्ज करून नीलेशची भेट घेतली. नीलेशने नवीन मीटरला मंजुरी आणि तपासणीचा अहवाल देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली. पीडित व्यक्तीला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे लिखित तक्रार केली.
पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संदीप जगताप यांनी तक्रारीची पडताळणी केली. पीडित व्यक्तीने नीलेशशी संपर्क केला. 5 हजार देणे शक्य नसल्याचे सांगितले. तडजोडीनंतर नीलेश 2 हजारात काम करण्यासाठी तयार झाला. मात्र सापळा कारवाई दरम्यान संशय आल्यामुळे त्याने लाच रक्कम स्विकारली नाही. परंतु तोपर्यंत एसीबीने पुरेसे पुरावे गोळा केले होते. एसीबीच्या पथकाने नीलेशला अटक करून नंदनवन ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई उपअधीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस शिपाई भागवत वानखेडे, पंकज घोडके, महेश सेलोकर, वकील, शरीफ आणि सदानंद यांनी केली.

Leave a Reply