तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? – रवी शंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना प्रतिप्रश्न

नवी दिल्ली : ५ ऑगस्ट – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारी आणि महागाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. देशात लोकशाहीची हत्या करण्यात आली असून भाजपामुळेच देशातील लोकशाही नष्ट झाल्याचा आरोप राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपानंतर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे.
आपल्या लोकशाहीचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधींच्याच आजीने मीडियावर बंदी घातली होती. काँग्रेसमध्ये चांगले नेते आहेत. पण तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? हा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधींचा पक्ष आहे. जनतेने तुम्हाला नाकारले, याला आम्ही जबाबदार कुठून? असा सवालही रविशंकर प्रसादांनी राहुल गांधींना विचारला आहे. आज कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवल्याचा जल्लोष व्यक्त केला जात आहे. मात्र, काँग्रेस हिटलरबद्दल बोलत आहे. परंतु आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाने हुकूमशाही बघितली असल्याची आठवण प्रसाद यांनी राहुल गांधींना करून दिली.
नॅशनल हेराल्डचे प्रकरण नेमके काय आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. हे प्रकरण भाजपा सरकार सत्तेवर येण्यापूर्वीचे आहे. राहुल गांधी आता देशावर टीका करत आहेत. आपला भ्रष्टाचार आणि राजकीय स्वार्थ लपवण्यासाठी ते देशातील संस्थांची बदनामी करत असल्याचा आरोप रविशंकर प्रसादांनी केला आहे.

Leave a Reply