मौदा येथील कन्हान नदीत पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

नागपूर : ४ ऑगस्ट – मौदा येथील कन्हान नदीवर पोहायला गेलेले दोन युवक वाहून गेल्याची घटना बुधवार, ३ ऑगस्ट रोजी घडली. राहुल दशरथ ठोंबरे (वय २५, रा. मौदा) व उमेश श्रावण ठाकरे (वय २७, रा. गोरेवाडा, नागपूर) असे मृतक युवकांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौदा येथील मातंग समाजाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (३ ऑगस्ट) करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त गोरेवाडा, नागपूर येथील उमेश ठाकरे हे मौदा येथील पांडुरंग बावणे यांचे जावई आहेत. ते या कार्यक्रमाला आले असता घटनेच्या दिवशी अंदाजे दोन वाजताच्या दरम्यान कार्यक्रम सुरू असताना कन्हान नदीवर (दीपाजवळ) जाऊन पोहण्याचा बेत आखला व पोहण्यासाठी अंगावरील कपडे काढून नदीपात्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने घटनेतील राहुल ठोंबरे वाहत गेला, तर उमेश ठाकरे जागीच दिसेनासा झाला.
या घटनेची माहिती शहरभर पसरली. तसेच येथील स्थानिक प्रशासनाच्यावतीने तहसीलचे कर्मचारी व पोलिस कर्मचारी नदीकाठी जाऊन शोध मोहीम सुरू केली. यावेळी नागरिकांनी फार मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला गालबोट लागल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply