ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात फेरबदल, बाबूल सुप्रियो यांची मंत्रिमंडळात वर्णी

कोलकाता : ४ ऑगस्ट – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. प्रसिद्ध गायक आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्यासह आठ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. राजभवनात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल गणेशन यांनी या नव्या मंत्र्यांना शपथ दिली.
विख्यात गायक असलेले बाबूल सुप्रियो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१९ ते २०२१ या काळात मंत्री होते. त्यांच्याकडे पर्यावरण, वने, वातावरणातील बदल आदी खात्यांची जबाबदारी होती. २०२१मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाल्याने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. मात्र सप्टेंबर २०२१मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि बॅलीगंज मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. सुप्रियो यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेते स्नेहसिंह चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा आणि प्रदीप मजुमदार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
‘‘मंत्रिमंडळात अधिकाधिक तरुणांना संधी देण्याची ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे. त्यामुळे तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे,’’ असे तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Leave a Reply